Video; नांदेडमध्ये महाराष्ट्र बचाव आंदोलनातून भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वसंतनगर येथील निवासस्थानी, आमदार राम पाटील रातोळीकर यांनी गावी तर महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करून शासनाच्या कार्यपद्धतीवर निषेध नोंदविला.  

नांदेड : राज्यात कोरोना विषाणु संसर्गांची परिस्थितीत हाताळण्यात राज्यातील ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ठाकरे सरकारच्या चुकीची धोरणे, कार्यपद्धतीमुळे राज्य कोरोनाच्या महाभयंकर संकटात सापडल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता.२२ मे) भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजपचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.  

ठाकरे सरकारच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतच चालला आहे. परिणामी, त्याचे परिणाम राज्यातील हातावर पोट असलेल्या कुटुंबांना, व्यापाऱ्यांना भोगावे लागत आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलनातून शासनाचा निषेध केला. नांदेड शहरामध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या वसंतनगर येथील निवासस्थानी शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन, घोषणा दिल्या. मारोती वाडेकर, प्रवीण पाटील चिखलीकर, नवल पोकर्णा, आशीष नेरळकर, मनोज जाधव, सुनील पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.  

हेही वाचा - मित्रांसोबत पार्टीला गेला, अन् पुढे काय झाले ते वाचाच

घोषणा आणि हातात फलक
या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हातात राज्य सरकार जागे व्हा, जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद करा, चला बळीराजाला बळ देऊ, कापूस विक्री आणि पिक कर्जासाठी साथ देऊ अशा स्लोगनचे फलक घेऊन तसेच जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. माजी जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर यांनी आपल्या गावी महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

हेही वाचलेच पाहिजे - कोरोना : बिलोली, मुखेडचे ‘ते’ बाधित बाहेरचे प्रवासी

कार्यालयासमोर केले आंदोलन
भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी आपल्या आयटीआय चौकातील कार्यालयासमोर महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. यावेळी अशोक पाटील धनेगावकर, उबनलाल यादव, विशाल शुक्ला, कुणाल गजभारे, राज यादव आदी उपस्थित होते. तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर यांनी ‘सोनू तुझा आघाडी सरकारवर भरोसा नाय का...नाय का...’ या गाण्यावर अभिनय करून ठाकरे सरकारचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध केला. यावेळी बुथ प्रमुख राजेशसिंह ठाकूर, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, लीना दिनेश ठाकूर, रुद्र ठाकूर, शुभिक्षा ठाकूर आदी उपस्थित होते.  

सरकार पूर्णपणे अयशस्वी
कोरोना संसर्गाचा प्रसार तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी अकार्यक्षम ठरले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, प्रत्येकाने कोराना विषाणुची धास्ती घेतली आहे. केवळ सरकारच्या अकार्यक्षम पध्दतीमुळेच असे होत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील सरकार गंभीर नसल्याने भाजपतर्फे सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध करत आहोत.
- प्रताप पाटील चिखलीकर (खासदार, नांदेड)

राज्यात आरोग्य अराजक पसरले
कोरोना विषाणूचा जबरदस्त विळखा राज्याला बसला असून, त्यावर उपाययोजना करण्यामध्ये राज्य शासन पूर्णपणे अपयशी होत आहे.  परिणामी नागरिकांमध्ये कोरोना विषाणूची मोठी दहशत निर्माण झालेली असून, मानसकि ताणतणावही यामुळे वाढले आहेत. 
- आमदार राम पाटील रातोळीकर (माजी जिल्हाध्यक्ष)  

सरकार सर्व आघाड्यावर अपयशी
ठाकरे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करून सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. राज्यातील कोरोना विषाणुची परिस्थिती आटोक्यात आणणे आवश्‍यक असून, शेतकऱ्यांच्या कापसाबद्दल ही सरकारचे धोरण योग्य नाही.  
- प्रवीण साले, महानगराध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Targets Thackeray Government Nanded News