बैल सजवला पण पोळा घरीच गाजवला...

विठ्ठल चिवडे
Wednesday, 19 August 2020


कंधार तालुक्यातील कुरुळ्यासह परिसरातील गावोगावी प्रतिवर्ष बळीराजा पोळ्याचा सण एकप्रकारे पर्वणीसम साजरा होतो. कोरडवाहू आणि प्रत्येकी जेमतेम शेतीक्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे मशागतीची कामे बहुतांशी बैलावरच विसंबून आहेत. हंगामदर हंगाम बळीराजाचा सवंगडी सुख दुःखाचा भागीदार बदलत्या निसर्गचक्रातही मोठ्या हिमतीने साथ देतो. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या या उत्सवावर कोरोनाची छाया गडद झाल्याने उत्साह असूनही भीतीच्या सावटाखाली पोळा सण साजरा करण्यात आला.

कुरुळा, (ता.कंधार, जि. नांदेड) ः ग्रामीण भागात वर्षातून एकदा येणारा बळीराजाचा उत्साहाचा आणि तितकाच आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा; परंतु यंदा कोरोनाच्या महामारीमुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घरीच साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा करण्याचे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यास कुरुळा परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला असून बैल सजवला पण पोळा घरीच गाजवला असे खेडोपाडी चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा -  नांदेडमधील एका लग्नाची अशीही गोष्ट, आरोप- प्रत्यारोपाने गाजली -

एकप्रकारे पर्वणीसम साजरा
कंधार तालुक्यातील कुरुळ्यासह परिसरातील गावोगावी प्रतिवर्ष बळीराजा पोळ्याचा सण एकप्रकारे पर्वणीसम साजरा होतो. कोरडवाहू आणि प्रत्येकी जेमतेम शेतीक्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे मशागतीची कामे बहुतांशी बैलावरच विसंबून आहेत. हंगामदर हंगाम बळीराजाचा सवंगडी सुख दुःखाचा भागीदार बदलत्या निसर्गचक्रातही मोठ्या हिमतीने साथ देतो. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या या उत्सवावर कोरोनाची छाया गडद झाल्याने उत्साह असूनही भीतीच्या सावटाखाली पोळा सण साजरा करण्यात आला. कुरुळा, दैठणा, सोमठाना, हिप्परगा, मरशिवणी, उमरगा, नागलगाव, दिग्रस यासह वाडी तांड्यावर शेतकऱ्यांनी घरोघरिच पारंपरिक पद्धतीने बैलजोडींना झूल व शिंगांना रंगरंगोटीने, साज शृंगार करून विधिवत लग्न, पूजा, आरती करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला.

प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद
वर्षानुवर्षे मातीत राबणाऱ्या या बैलांना दैवत मानून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी या मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या सावटामुळे कुठलाही गाजावाजा नाही की फटाक्यांची आतिषबाजी नाही. पाच पांडवांची पूजा करून बहुतांशी शेतकऱ्यांनी तर स्वतःच्या शेतातीलच देवीदेवतांच्या भोवती फेऱ्या घालून पोळा साजरा केला. एकंदरीत सामूहिक गर्दी न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. या वेळी पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. त्यात कुरुळा बिट जमादार एस.एम. चोपडे, बालाजी केंद्रे, एस.बी. सोनटक्के, एस.जी. तलवार यांनी काम पाहिले.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bull Was Decorated But The Pola Was Kept At Home, Nanded News