मालमतेच्या कारणावरुन विवाहितेस पेटवले; चौघांवर गुन्हा दाखल

file photo
file photo

नायगाव (जि. नांदेड) - मालमत्तेच्या कारणावरुन नायगाव तालुक्यातील बरबडा गावात एका विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) घडली होती. या प्रकरणी तब्बल आठ दिवसानंतर गुरूवारी (ता.२४) रात्री उशीरा येथील कुंटूर पोलिस ठाण्यात सासरच्या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

बरबडा येथील विवाहिता पवलिका श्रीनिवास गुळवे (वय २८) हिच्या माहेरच्या मालमत्तेवरुन सासरच्या मंडळीविरूद्ध वाद होता. त्या वेळी कुंटूर पोलिसांनी समजावून वाद मिटवलाही होता. तसेच एकदा प्रतिबंधक कारवाईही केली होती. पण वाद काही मिटत नव्हता. शेवटी ता. १८ डिसेंबर रोजी विवाहितेस मारहाण करुन सासू उमाबाई गुळवे यांच्यासह अन्य नातेवाईकांनी अंगावर रॉकेल टाकल्यानंतर पेटवून दिले. या घटनेत विवाहिता गंभीर भाजली. तिला पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पवलीका गुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटूर पोलिसांनी उमाबाई गुळवे, श्रावंती गुळवे, रमेश गुळवे व नारायण गुळवे या चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मोबाईलची दुकान फोडून चोरी 
नांदेड ः वाजेगाव भागातील मुदखेड रस्त्यावर ए एस मोबाईल ॲण्ड होम अप्लायंसेस नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या पाठ भिंतीला अंदाजे दोन फुट गोलाचे छिद्र पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील २७ हजाराचे २९ मोबाईल आणि दुरूस्तीसाठी आलेले २० हजाराचे १८ मोबाईल असा एकूण ४७ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याबाबत दुकानदार मोहमंद सोहेल अब्दुल सलीम (रा. बिलालनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नायक सुर्यवंशी करत आहेत. 

घरात घुसून मारहाण 
नांदेड ः किनवट शहरातील गणेशपुर भागात रामदास पुनाजी कनाके (वय ६५) यांना त्याचा भाऊ त्यांच्या हिश्शाचे सामाईक शेतीचे शासनातर्फे मिळणारे पैसे प्रत्येकी १२ हजार रुपये देत होता. त्यावेळी मलाच पैसे द्या, असे म्हणाल्याने रामदास कनाके यांनी सदरचे पैसै गोविंदराव कनाके यांच्या मुलास दिले. त्याचा राग मनात धरून रामदास कनाके यांच्या घरात घुसून धक्काबुक्की करण्यात आली व काठीने मारहाण करून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार पठाण करत आहेत. 
 
अपघातात गायीसह दुचाकीस्वाराचा मृत्यू 
नांदेड ः भोकर ते हिमायतनगर रस्त्यावर ज्ञानेश्वर फुलाजी भिसे (वय २१, रा. पिरंजी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) याने त्याच्या ताब्यातील दुचाकीवर तिघांना घेऊन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून गायीला धडक दिली. त्यात गाय आणि ज्ञानेश्वर भिसे हे दोघे गंभीर जखमी होऊन मरण पावले. सदरील घटना राघोजी यंगलवाड यांच्या घरासमोर शनिवारी (ता. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत प्रकाश प्रभुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार कांबळे करत आहेत.
 
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

युवकाची आत्महत्या 
नांदेड ः शेकापूर (ता. कंधार) येथील सुशांत दत्ता भुस्कटे (वय २७) याने विष प्राशन केल्यामुळे त्याला विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. सदरील घटना मंगळवारी (ता. २२) रात्री बाराच्या सुमारास घडली असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत पोलिस नायक डब्ल्यू. के. कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नायक टाकरस करत आहेत. 
 
जुगार खेळणाऱ्यांना अटक 
नांदेड ः पोस्ट आॅफिसच्या बाजूला गोदावरी अर्बन बॅंकेच्या पाठीमागे टीन पत्र्याच्या टपरीत गुरूवारी (ता. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास काहीजण विना परवाना आणि बेकायदेशिररित्या आॅनलाइन जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणचे जुगाराचे साहित्य आणि रोख १९ हजार पन्नास रुपये जप्त केले. याबाबत पोलिस नायक संतोष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नायक कवठेकर करत आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com