अयोध्येतील भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा साजरा करा- खा. चिखलीकर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 5 August 2020

आपल्या सर्वांच्या आयुष्यातील हा ऐतिहासिक दिवस आपण सर्वांनी दिवाळी सारखा साजरा करावा. हा ऐतिहासिक क्षण भव्य प्रमाणात साजरा करताना, कोरोना साथीचे भान ठेवायला हवे असे आवाहन नांदेडचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

नांदेड :  करोडो हिंदू भाविकांचे अनेक वर्षाचे स्वप्न आज आयोध्येत साकार होत आहे. देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायभरणी सोहळा बुधवार (ता. पाच) ऑगस्ट रोजी होत आहे. एक प्रदिर्घ लढा सफल होत असून भारतीय जनता पक्षाचे या लढ्यात फार मोठे योगदान आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील हा ऐतिहासिक दिवस आपण सर्वांनी दिवाळी सारखा साजरा करावा. हा ऐतिहासिक क्षण भव्य प्रमाणात साजरा करताना, कोरोना साथीचे भान ठेवायला हवे असे आवाहन नांदेडचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांनी केले आहे.

आपल्या जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. सर्वांनी या कोरोनाच्या साथीचे भान ठेवून आपल्या आयुष्यातील राम मंदिर पायाभरणीचा हा ऐतिहासिक क्षण दिवाळीसारखा साजरा करावा. अयोध्येतील श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे या लढ्यात फार मोठे योगदान आहे. राम मंदिर आंदोलनात आपल्यापैकी अनेक कार्यकर्ते सक्रीय सहभागी झाले होते. नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, हा दिवस आपण सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा, आपण हा ऐतिहासिक क्षण भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करत असताना, कोरोनाच्या साथीचे भान ठेवायला हवे आणि त्यामुळेच आपण सामुहिक उत्सव करु नये.

हेही वाचानांदेडला कोरोनाग्रस्तांचा आकडा अडीच हजारावर

टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पहावा

नांदेड जिल्हा भाजपाचे आवाहन आहे की, ता. पाच ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी आपआपल्या घरावर रोषणाई करावी, घरावर गुढी उभारावी, दिवाळीप्रणाणे आकाशकंदिल लावावे, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. हा ऐतिहासिक क्षण साजरा करताना घरी आवर्जून गोड पदार्थ करावेत. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पहावा. आपण वैयक्तीक पातळीवर केलेल्या उत्सवाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिध्द करुन आपल्या मित्रांसोबत आनंद व्दिगुणित करावा.

ता. पाच ऑगस्ट रोजी राममंदिराचे फलक लावावे

घरोघरी उत्सव साजरा करत असताना ता. पाच ऑगस्ट रोजी राममंदिराचे फलक लावावेत. घरासमोर रांगोळी काढावी, या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करताना सर्वांनी कोरोनाच्या साथीमुळे असलेले निर्बंध विसरु नये, मास्क वापरावे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळूनच आजचा दिवस दिवाळीसारखा साजरा करावा असे आवाहन खा.चिखलीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गोजेगांवकर यांच्यावतीने समस्त रामभक्तांना करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate Ram Mandir Bhumi Pujan in Ayodhya like Diwali. Chikhlikar nanded news