सीईओ वर्षा ठाकूर यांचा दणका, आरोग्य विभागाचे चार कर्मचारी निलंबीत

प्रल्हाद कांबळे
Friday, 9 October 2020

आपल्या कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोन आरोग्य उपकेंद्रातील चार जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दणका देत त्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. या निर्णयामुळे कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे. शहरासह ग्रामिण भागात या महामारीने सर्वांनाच त्रस्त करुन सोडले आहे. या आजारात आरोग्य विभागातील डॉक्टरसह वैद्यकीय सेवा देणाऱ्या यौध्यांकडे नागरिक देव म्हणून पहात आहेत. काही वैद्यकीय अधिकारी उत्तम काम करत असून काही जण मात्र बेजबाबदारीने वागत आहेत. आपल्या कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोन आरोग्य उपकेंद्रातील चार जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दणका देत त्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. या निर्णयामुळे कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोरोनाचा काळ असल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तेथील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी देखील रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या सूचना असताना अनेक ठिकाणी डॉक्टर्स व कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी  (ता. आठ) सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील कासारखेडा व मालेगाव येथील आरोग्य उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या. यावेळी कासारखेडा येथे तर दुपारी साडेचार वाजता उपकेंद्राला कुलूप असल्याचे आढळून आले. तसेच मालेगाव येथे एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करुन आपल्या कामाचा हादरा दिला. 

हेही वाचा पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये ५४ जणांची चौकशी, गुन्हेगार सैरभर

अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास या दोन्ही उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. दोन्ही उपकेंद्रातील एकूण चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रत्येक उपकेंद्राला एक पुरुष व स्त्री नियुक्त (एएनएम) करण्यात आल्या आहेत. नियमानुसार या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा अनेक ठिकाणी कर्मचारी तयार नसतात किंवा नांदेड शहरापासून जवळच असलेल्या केंद्रातील कर्मचारी नांदेडला राहत असल्याचे दिसून आले आहे.

येथे क्लिक करानांदेड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार -

कामचुकार व दांडीबहाद्दरांना सोडणार नाही

मागील आठवड्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांची बैठक घेऊन स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या सर्वांनी कोरोना महामारीच्या काळात मुख्यालयात वास्तव्य करून राहावे तसेच रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगण्यात आले होते. येणाऱ्या काळात कामचुकार कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशाराही श्रीमती ठाकूर यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CEO Varsha Thakur's beating, four employees of the health department suspended nanded news