बदलत्या जीवनशैलीमध्ये ज्येष्ठांचा होतोय कोंडमारा

प्रमोद चौधरी
Monday, 12 October 2020

कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती अडगळीचे सामान झालेल्या आहेत. त्यांना अवहेलनेस सामोरे जावे लागत आहे. पालनकर्त्यांची आम्हाला गरज वाटत नाही. कारण सारेच करिअरमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे आजी-आजोबांची गरज नकोशी झाली आहे. परिणामी ज्येष्ठांचे जीवन असहाय्य झालेले आहे.

नांदेड : समाजव्यवस्था, जीवनशैली यामुळे मनुष्य घरातील ज्येष्ठांपासून दुरावत चाललेला आहे. निसर्गाचे चक्र माणसाने बिघडवले तसेच परिवर्तनामुळे समाजातील ज्येष्ठांचे स्थान धोक्यात आलेले आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. ती आज लोप पावत चालली आहे. त्यामुळे समाजात, कुटुंबात ज्येष्ठांचे स्थान धोक्यात आलेले आहे.

अवहेलना, कौटुंबिक छळ यासारख्या गोष्टी समाजात सातत्याने वाढत आहेत. टीव्ही, वर्तमानपत्र पाहिल्यावर या बातम्या पाहायला मिळतात. त्या वाचल्यावर सामाजिक पर्यावरणाचा तोल ढळत चाललेला आहे, असे आपल्याला वाटत नाही का? पर्यावरणासाठी झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश देणारे आपण घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही.  समाजाचे आधारस्तंभ असे फक्त म्हणतो, प्रत्यक्षात चित्र विरोधाभासी आहे. आज आपण प्रत्येक दिवस साजरा करतो.

हेही वाचा - सबसिडीसाठी ग्राहकांना सोसावा लागतोय आर्थिक भूर्दंड

एक आॅक्टोबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो; पण त्याचे महत्त्व त्या दिवसापुरतेच राहते. परत येरे माझ्या मागल्या, हे चित्र बदलणार कोण? हे चित्र बदलायचे असेल तर विचार बदलले पाहिजेत. ज्येष्ठही अडगळीतील वस्तू नसून दीपस्तंभ आहेत. समाज, व्यक्ती आणि राष्ट्र यांना मानाचे स्थान प्राप्त करायचे असेल तर ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. ज्येष्ठांना कुटुंबात, समाजात मानाचे स्थान दिले पाहिजे.

हे देखील वाचा - तीन अनाथांचा ‘एक नाथ’ शोधण्यासाठी संघर्ष सुरू

शासनाने पुढाकार घ्यावा
नोकरी, व्यवसायानिमित्ताने आपण, आपली पत्नी, मुले बाहेर असतो. उतारवयात पैशापेक्षा आपुलकीची गरज आहे, ती आपण दिली तर ज्येष्ठांमध्ये येणारे नैराश्य, उदासीनता दूर होण्यास मदत होईल. जो आनंद संस्कार वर्गामध्ये मिळणार नाही, तो आजी-आजोबांबरोबर मिळेल. पण त्यासाठी कुटुंब म्हणून सर्वांनी सुसंवाद साधावा. त्यामुळे जनरेशन गॅप कमी होईल. ज्येष्ठांच्या संबंधी आज जे चित्र निर्माण झाले आहे ते चित्र बदलण्यास शासनाने पुढाकार घेतला तर सामाजिक पर्यावरण राखता येईल.

हेही वाचलेच पाहिजे -  जिल्ह्यात ३८५ कोरोना पॉझिटिव्ह पुरुषांचा मृत्यू, सर्वाधिक पुरूषांचा हायरिस्कमध्ये समावेश

विचार परिवर्तन आवश्यक
दिन साजरे करून वृद्धांचे जीवन सन्मानित होणार नाही. त्यासाठी मी काय करू शकतो, हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्यासाठी माझे दाईत्व काय, हा विचार कुटुंबातील प्रत्येकाने ज्येष्ठांसाठी करावा. मुलांना आजी-आजोबांचा सहवास प्रेम लाभावे, यासाठी त्यांना वृद्धाश्रमामध्ये न ठेवता त्यांना आपल्यासोबत ठेवेन, असा विचार आवश्यक आहे. मुलांना संस्कार वर्गात पाठवितो; पण ज्यांच्याकडे ज्ञान, संस्कार, प्रेम देणारे आहेत, त्यांना दुर्लक्षित करतो ही वास्तव संपायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In A Changing Lifestyle Seniors Are Getting Sick Nanded News