चौदा वर्षानंतर जिल्ह्यातून चिकनगुनिया हद्दपार! आरोग्य यंत्रणेचा अहवाल; रुग्णांचे प्रमाण झाले कमी 

शिवचरण वावळे
Thursday, 27 August 2020

१४ वर्षांपूर्वी एप्रिल २००६ मध्ये नांदेड शहरासह जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक १२ चिकनगुनियाचे रुग्ण आढळुन आले होते. या शिवाय लोहा, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट या तालुक्यात मिळून जानेवारी ते डिसेंबर २००६ या वर्षभराच्या काळात चिकनगुनिया आजाराने चांगलेच डोके वर काढले होते

नांदेड : जिल्ह्यात २००६ मध्ये सर्वात जास्त चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. डेंगीच्या आजाराप्रमाणे हा आजार असला तरी त्याबद्दल फारशी जनजागृती नसल्याने कोरोना आजाराप्रमाणेच चिकनगुनिया आजाराबद्दल लोकांच्या मनात भीती आणि गैरसमज होते. मात्र, जिल्हा हिवताप विभागाकडून वेळोवेळी घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे तब्बल १४ वर्षानंतर जिल्हा चिकनगुनिया मुक्तीकडे वाटचाल करत आहे. 

१४ वर्षांपूर्वी एप्रिल २००६ मध्ये नांदेड शहरासह जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक १२ चिकनगुनियाचे रुग्ण आढळुन आले होते. या शिवाय लोहा, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट या तालुक्यात मिळून जानेवारी ते डिसेंबर २००६ या वर्षभराच्या काळात चिकनगुनिया आजाराने चांगलेच डोके वर काढले होते. या दरम्यान २८ हजार ७४६ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणी करता घेतले असता त्यामध्ये दोनशे चिकनगुनियाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातून देण्यात आली. 

हेही वाचा- Video-नांदेडला आईसक्रीम कोल्ड स्टोरेज आगीत जळून खाक ​

चिकनगुनिया आजाराचे डेंगी आजाराप्रमाणेच लक्षणे

चिकनगुनिया आजार उघडपणे दिसत नसला तरी, त्याच्या लक्षणावरुन त्या रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालानंतर त्या रुग्णास खरच चिकनगुनिया आहे की नाही, याबद्दल अहवाल दिला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. चिकनगुनिया आजाराचे डेंगी आजाराप्रमाणेच लक्षणे आहेत. मात्र या आजाराने लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. मागील काही वर्षभरापासून जिल्ह्यातील डेंगी आजाराच्या रुग्णसंख्येत घट झाली. त्याप्रमाणेच चिकनगुनिया आजारात देखील घट झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येते. 

हेही वाचलेच पाहिजे- कृष्णूरच्या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील जुगार, कुंटुर पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना केली अटक​

१४ वर्षात चिकनगुनिया आजारांच्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी

जानेवारी ते जुलै २०१९ दरम्यान केवळ चार रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन चिकनगुनिया तपासणी करण्यात आली होती. यात केवळ एका व्यक्तीला चिकनगुनियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर २०२० मध्ये पाच संशयित व्यक्तींचे रक्तजल तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी दोन जणांना चिकनगुण्या झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्या १४ वर्षात चिकनगुनिया आजारांच्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी झाल्याने नांदेड जिल्हा हा चिकनगुनिया मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयातून सांगण्यात आले. 
-
अशी आहेत चिकन गुनिया आजाराची लक्षणे 

- डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसात लक्षणे दिसून येतात. 
- अंगात १०४ अंशा पेक्षा अधिक ताप असतो. 
- सांधे दुखणे, सांध्यावर सुज येणे. - डोके, अंग दुखते. 
- उलटी, मळमळ याशिवाय हातापायावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसून येतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chikungunya Banished From The District After 14 Years! Health System Report The Number Of Patients Decreased Nanded News