Video-नांदेडला आईसक्रीम कोल्ड स्टोरेज आगीत जळून खाक

शिवचरण वावळे
Thursday, 27 August 2020

पावसाळ्यात आईस्क्रीम कोल्ड स्टोरेजला आग लागली. हे आनेकांच्या डोळ्यावर विश्‍वास न बसणारे आहे. मात्र हे खरे आहे. आईसक्रीम  कोल्ड स्टोरेज मधील फ्रिजरमधील कॉम्प्रेशरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला.

नांदेड - शहरातील मुख्य वसाहतीमध्ये असलेल्या शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील एका आईसक्रीम कोल्ड स्टोरेजला गुरुवारी (ता. २७) सकाळी नऊच्या दरम्यान आग लागली. या आगीत कोल्ड स्टोरेज जळून खाक झाले आहे.

केंब्रिज विद्यालयासमोरील शीतल आईसक्रीम (न्यू मेट्रो इंटरप्रायजेस) कोल्ड स्टोरेजला सकाळी अचानक आग लागली. संपूर्ण परिसरात धुरांचे लोट उसळल्याने आजूबाजुला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही जणांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी आग लागल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. 

हेही वाचा- नांदेडचा हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर, कोणता ते वाचा? ​

तिन्ही बाजुने दुकाने 

आईस्क्रीम कोल्ड स्टोरेजला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. फ्रिजरमधे असलेल्या कॉम्प्रेशरचे स्फोट होऊ लागले. त्यामुळे आग तिन्ही बाजूने पसरत होती. पश्चिमेकडे लोकमनवार यांचे नमकीन, चुरमुरेचे गोडाऊन होते. मागच्या बाजूला फर्निचर वर्क्स होते व पुर्वेकडे हिरालाल टाईल्सचे स्टोअर होते. त्यामुळे ही आग आबाजुला असलेल्या चुरमुरे दुकानास किंवा फर्निचर दुकानास आग लागू नये म्हणून अग्निशमन दलाने तिन्ही बाजूला आग पसरु नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. 

हेही वाचा- संकटांची शिदोरी आमच्याच पाठीशी कारे देवा ? ​

आगीचे कारण अस्पस्ट

विशेष म्हणजे गुरूवारी सकाळी लागलेल्या आगीची नोंद जवळच असलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली नव्हती. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच घटनास्थळी याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहे. दुसरीकडे आईसक्रीम कोल्ड स्टोरेजला लागलेली आग बघुन मोहमंद साजीद नूर मोहमंद यांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही वेळात त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांनी अनेकांशी फोन वरुन संवाद देखील साधला 

वीस लाख रुपयापर्यंतचे नुकसान
सकाळी नऊच्या दरम्यान आईसक्रीम कोल्ड स्टोरेजला आग लागल्याचे समजले. फॅक्ट्रीमध्ये दोन आईसक्रीम कोल्ड स्टोरेज जळुन खाक झाले. या शिवाय दोनशे ते अडीचशे नमकीन बॉक्स होते. ते सुद्धा जळुन खाक झाले. यात अंदाजे वीस लाख रुपयापर्यंतचे नुकसान झाले आहे. 
- मोहमंद साजीद नूर मोहमद, न्यू मेट्रो इंटरप्रायजेस आईसक्रीम कोल्ड स्टोरेज. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Ice Cream Cold Storage Burnt To Ashes Nanded News