esakal | जिल्हाधिकारी विपिन यांनी घेतली ढवळे कुटुंबियाची भेट; सात्वन करुन दिले न्यायाचे आश्वासन

बोलून बातमी शोधा

चोंडी भेट
जिल्हाधिकारी विपिन यांनी घेतली ढवळे कुटुंबियाची भेट; सात्वन करुन दिले न्यायाचे आश्वासन
sakal_logo
By
एकनाथ तिडके

माळाकोळी ( जिल्हा नांदेड ) : चोंडी तालुका लोहा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे यांनी ता. 28 एप्रिल 2021 रोजी वन विभागातील भ्रष्टाचार व हरिण व मोरांच्या हत्येची चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी निवेदन देऊन वन विभागाच्या जमिनीवर जाळून घेत आत्मदहन केले होते. दरम्यान माळाकोळी पोलिस ठाणे येथे सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी ( ता. 29 ) रोजी जिल्हाधिकारी विपीन, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी ढवळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली.

ता. 29 एप्रिल रोजी चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर व पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे आले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली व शिवदास ढवळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणातील शिवदास ढवळे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्ती व संस्था यांची सखोल चौकशी करून पिडीत कुटुंबाला न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले.

हेही वाचा - गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान मांजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक शेषेराव भुजंगराव पवार (वय ५४) हे मोटार सायकालवर शाळेच्या कामानिमित्त नांदेड येथून मांजरमला येत होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राजू सोनाळे, राहुल चिखलीकर यांनी ढवळे कुटुंबीयांची भेट घेतली व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सदर प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा शिवाय शिवदास ढवळे यांचे आत्मदहन आहे किंवा घातपात झाला आहे याचीही सखोल चौकशी केली जावी अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पोलिसांना सूचना केल्या. यावेळी पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व सुदाम ढवळे तिरुपती ढवळे, मुलगा जनार्दन ढवळेसह चोंडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलिस व वन विभागाने दुर्लक्षामुळे झाला मृत्यू

दरम्यान चोंडी येथील ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवदास ढवळे यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही पोलिसांनी त्यांची भेट घेतली का? त्यांना नोटीस दिली का? त्यांच्या निगराणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली का? असे प्रश्न उपस्थित करत पोलिस विभागाने व वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच शिवदास ढवळे यांचा बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षकांनी माळाकोळीतील ठाणेदाराची याबाबत चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली याबाबत अधिकृत दुजोरा मात्र होऊ शकला नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे