esakal | दुचाकीच्या धडकेत शिक्षक ठार; दोन जण गंभीर, गडगा- कहाळा रस्त्यावरील घटना

बोलून बातमी शोधा

शेषेराव पवार
दुचाकीच्या धडकेत शिक्षक ठार; दोन जण गंभीर, गडगा- कहाळा रस्त्यावरील घटना
sakal_logo
By
चंद्रकांत सूर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : नायगाव तालुक्यातील गडगा- कहाळा रस्त्यावर मांजरम शिवारात वळण रस्त्यावर दोन मोटार सायकलीच्या समोरासमोरील धडकेत एक शिक्षक जागीच ठार झाला. तर दुस-या मोटार सायकालवरील एक पुरुष व महिला दोन्ही गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी (ता. २९) सकाळी घडला.

सार्वजनिक बांधकाम विभाग नायगाव यांच्या अंतर्गत असलेला रस्ता नव्याने तयार केला असून रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच रस्त्यावर दिशा दर्शक फलक व वळणरस्ता संकेत फलक लावले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा - नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार

ता. २९ एप्रिल गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान मांजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक शेषेराव भुजंगराव पवार (वय ५४) हे मोटार सायकालवर शाळेच्या कामानिमित्त नांदेड येथून मांजरमला येत होते. तर मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथील सासु व जावई हे कामानिमित्त नांदेडला जात असताना समोरासमोर जोराची धडक झाली. यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आल्याची माहिती मांजरमचे पोलिस पाटील जयराज शिंदे यांनी दिली. सदरील शिक्षक विद्यार्थी प्रिय होते. शिक्षक व साहित्यिक असलेल्या पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे