दिलासादायक : ‘त्या’ चार पॉझिटीव्हपैकी एक सापडला

प्रल्हाद कांबळे
Thursday, 7 May 2020

कोरोना बाधीत आढळलेल्या २० रुग्णापैकी चार जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी गुरुवारी (ता. सात) एकाला पकडण्यास पोलिसांना यश आले.  मात्र तिघेजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा कसुन शोध सुरू. 

नांदेड : येथील लंगरसाहिब गुरूद्वारामधील कोरोना बाधीत आढळलेल्यानंतर बेपत्ता झालेल्या चार जणांपैकी एकाला गुरूवारी (ता. सात) लंगरसाहिब गुरूद्वारा परिसरात ताब्यात घेतल्याचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. मात्र त्याचे तिन सहकारी अद्याप बेपत्ता असल्याने नांदेडकरांची व प्रशासनाची चिंता कायम आहे. 

शहर व जिल्हा २० एप्रिलपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर नांदेडमधील पीरबुऱ्हाण नगर भागातून एक ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आला. त्यानंतर २८ रोजी सेलूची त्यानंतर रहमतनगर येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. पुन्हा बुधवारी (ता. सहा) अबचलनगर भागातील एक ५६ वर्षीय व्यक्तीचा अशा चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पंजाब येथे यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या चार चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा

दरम्यान नांदेड येथून पंजाब येथे गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची ओरड होत आहे. पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारला रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. तेथील आरोग्यमंत्री ही आपल्या सरकारचा निषेध नोंदवित असून नुकसानाची दावा ठोकण्याची भाषा बोलू लागले आहेत. तर दुसरीकडे शनिवारी (ता. दोन) ज्या वीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले, अशांना अहवाल येईपर्यंत नजरकैदेत ठेवणे अपेक्षीत होते. त्या वीसच्या वीस जणांना सोडून प्रशासन मोकळे झाले. यातील कोरोना बाधीत असलेले चार जण अद्याप सापडले नाहीत. अखेर जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन महापालिकेचे प्रयोग शाळा तंत्रज्ञ सुदर्शन गंगाराम आदमनवार (वय ३९) यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे करत आहेत. 

हेही वाचा गुप्तांगावर लाथा मारून खून करणाऱ्या पिता- पुत्रास कोठडी

पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदीप शिवले तळ ठोकून

शहरातून कोरोनाबाधीत चार जण बेपत्ता झाल्याने त्यांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करणे हे मोठे आव्हान पोलिस व जिल्हा प्रशासनासमोर होते. त्यासाठी पोलिसांनी गुरूद्वारा, लंगरसाहिब, शहरातील विविध गुरुद्वारे, गर्दीचा परिसर, वजिराबाद, चिखलवाडीसह आदी परिसर पिंजून काढला. त्यात गुरूवारी (ता. सात) एकाला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. सकाळी पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्यासह आदी पोलिस अधिकारी लंगरसाहिब गुरुद्वारामध्ये तळ ठोकून आहेत. दरम्यान चंद्रपूर पोलिसांनी पकडेलेले ते तिघेजण नांदेड येथील नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfort: One of the four positives was found nanded news