गुप्तांगावर लाथा मारून खून करणाऱ्या पिता- पुत्रास कोठडी

प्रल्हाद कांबळे
Thursday, 7 May 2020

इकळीमोर (ता. नायगाव) येथील खून करणाऱ्या पिता- पुत्राला पोलिस कोठडी, तसेच कुंडलवाडी येथील घटनेत एकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला. 

नांदेड : नालीच्या सांडपाण्यावरुन झालेल्या वादातून मारेकरी पिता- पुत्रानी एका ६५ वर्षीय व्य्क्तीच्या गुप्तांगावर लाथा मारून निर्घृण खून केला. ही घटना इकळीमोर (ता. नायगाव) येथे बुधवारी (ता. सहा) सायंकाळी सकाळी सात वाजता घडली. शेख अब्दुल रहेमान असे मयताचे नाव आहे. 

इकळीमोर (ता. नायगाव) येथे राहणारे शेख अब्दुल रहेमान शेख मिरसाब (वय ६५) आणि शिवाजी गणपत वडजे (वय ४८) हे शेजारी आहेत. या दोघात नालीच्या सांडपाण्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असत. यातूनच बुधवारी (ता. सहा) सकाळी सातच्या सुमारास पुन्हा याच कारणावरून या दोन कुटंबात वाद झाला. वादाचे पर्यावसण थेट तुंबळ हाणामारीत झाले. यातून शेख रहेमान शेख मिरसाब (वय ६५) यांना शिवाजी गणपती वडजे आणि त्याचा मुलगा गणपती वडजे (वय २०) यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांना फरफटत नेऊन त्यांच्या गुप्तांगावर लाथा मारुन तुडवून खून केला.

घटनेनंतर कुंटुर पोलिस घटनास्थळी

घटनेनंतर कुंटुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांना समजातच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या शेख अब्दुल यांना नायगावच्या प्राथमीक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्‍णालय सुत्रांनी सांगितले. 

हेही वाचाकुंडलवाडीत लिपीकास लाथबुक्यानी मारहाण

एक दिवसाची पोलिस कोठडी

या प्रकरणी शेख आरीफ शेख अब्दुल रहेमान (वय ३५) याच्या फिर्यादीवरुन कुंटुर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी बुधवारी रात्री या दोन्ही पिता- पुत्रांना अटक केली. या दोघांनाही गुरूवारी (ता. सात) नायगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती करीम पठाण यांनी सांगितली. या खूनाचा तपास स्वत: श्री. पठाण करत आहेत. 
 
एकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

कुंडलवाडी : कुंडलवाडी येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या एका व्यक्तीवर मंगळवारी (ता. पाच) मध्यरात्री धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला झाल्यामुळे व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (ता. सहा) सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांत मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कुंडलवाडी पोलिसांत अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पोचम्मागल्ली भागातील रहिवासी पोतन्ना भुमन्ना आरशेवार (वय ५५) हे उन्हाळ्याचे दिवस असल्याने व घराचे बांधकाम सुरू असलेल्या अंगणात बाज टाकून झोपले होते. मंगळवारी (ता. पाच) मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून पोतन्ना आरशेवार हे झोपेत असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. 

हेही वाचानांदेडची चिंता कायम : ‘ते’ चार पॉझिटीव्ह रुग्ण बेपत्ताच

मुलाने पाहिले वडिलांना रक्तभंबाळ अवस्थेत

बुधवारी (ता. सहा) सकाळी वडील झोपेतून न उठल्यामुळे मुलगा बाबू याने जवळ जाऊन पाहिले असता वडील रक्तभंबाळ अवस्थेत असल्याचे दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तातडीने त्यांना कुटुंबीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेले होते. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड यांनी प्राथमिक उपचार करून नांदेडला घेऊन जाण्यास सांगितले. नांदेडच्या खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी केला पंचनामा

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सुरेश मांटे यांनी घटनास्थळी भेट दिली. अशोक इंगळे पाटील, वसंत खंदारे, महेश माकुरवार यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी कुंडलवाडी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे कुंडलवाडी शहरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

सध्या लॉकडाउन व त्यातही पोलिसांची गस्त असताना अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला झाल्यामुळे कुंडलवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हल्लेखोरांना शोधून काढणे कुंडलवाडी पोलिसांसमोर एक आव्हान आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कोणी व का केला हे मात्र समजू शकले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and son jailed for killing by kicking genitals nanded news