नांदेड येथे आज होणाऱ्या पतंग महोत्सवासाठी स्पर्धक तयार

प्रल्हाद कांबळे
Sunday, 17 January 2021

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानावर होणारी जबरदस्त पतंगबाजी तसेच विविध आकाराचे आकर्षक पतंग पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.

नांदेड : पहिल्या पतंग महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून रविवार (ता. १७) जानेवारी दुपारी एक ते चार या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानावर होणारी जबरदस्त पतंगबाजी तसेच विविध आकाराचे आकर्षक पतंग पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.

पुरातन काळापासून भारतात सर्वत्र मकर संक्रांतीचे औचित्य साधून पतंग उडवण्यात येतात. यासाठी नांदेड येथील नवा मोंढा मैदान स्वच्छ करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी अनेक इच्छुकांनी नाव नोंदणी केली आहे. संगीताच्या तालावर पतंगबाजी करत असतांना नृत्य स्पर्धेचे देखील आयोजन लॉयन्स क्लब नांदेड मीड टाऊन व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.  

स्पर्धेसाठी अठरा वर्षाखालील मुले, एकोणिस ते चाळीस वर्षापर्यंतचे पुरुष, चाळीस वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्व वयोगटातील महिला तसेच माध्यम प्रतिनिधी असे पाच गट करण्यात आले असून प्रत्येक गटातील तिघांना एक हजार, सहाशे आणि चारशे रुपयाचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय आकर्षक पतंग बनविणाऱ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेमध्ये नोंदणी निशुल्क असून इच्छुकांनी स्वतः पतंग व दोऱ्यासगट चरखा आणायचा आहे. नायलॉन अथवा चायना मांजाला परवानगी नाही. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लॉ. जुगलकिशोर अग्रवाल, लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि लॉ. शिरीष कासलीवाल, लॉ. मनीष माखन, लॉ. ॲड. उमेश मेगदे, लॉ. शिरीष गीते, लॉ. सुनील साबू हे परिश्रम घेत आहेत. या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन लॉयन्स परिवारातर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competitors ready for today's Kite Festival in Nanded