
नांदेडला काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसतर्फे शुक्रवारी (ता. १९) वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना सुरक्षा किटचे मोफत वाटप करण्यात आले.
नांदेड - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) कोरोनाशी रात्रंदिवस लढणाऱ्या पोलिस दलाच्या शहर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
शहरातील व्हिआयपी रोडवरील कुसुम सभागृहात शुक्रवारी (दि.19) सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, काँग्रेस विधान परिषदेतील प्रतोद महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, बांधकाम व शिक्षण सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, स्थायी समिती माजी सभापती किशोर स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती प्रकाशकौर खालसा, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, कंधार-लोहाचे प्रभारी डॉ. श्याम तेलंग आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांमधला डॉक्टर जागा होतो तेव्हा...
कोरोनाशी लढणाऱ्या पोलिसांचा सन्मान
आमदार राजूरकर म्हणाले की, लॉकडाऊन काळात जिल्ह्याचे पोलीस दल एखाद्या सैनिकासारखे लढले. त्यांनी जीव धोक्यात केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले. माजी पालकमंत्री सावंत म्हणाले की, चांगल्या कामाची दखल घेऊन त्याचे कौतूक करणे ही काँग्रेसची परंपरा आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा जिल्हा काँग्रेसने जपलेली असून कोरोनाशी लढणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला, हा त्याचाच एक भाग आहे. पोलीस अधिक्षक मगर म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. आजचा कार्यक्रम पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारा आहे.
सत्कार करून सुरक्षा किट
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, शहर वाहतूक शाखेचे चंद्रशेखर कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, शिवाजीनगर ठाण्याचे ए. एन. नरोटे यांच्यासह इतरांचा सत्कार करून सुरक्षा किट देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांनी आभार मानले. श्री. पांडागळे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी सीमेवर चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
हेही वाचलेच पाहिजे - सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी......कुठे ते वाचा -
सुरक्षा किटमध्ये साधनांचा समावेश
शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्ये सर्व अत्यावश्यक वस्तुंचा समावेश आहे. एन - ९५ प्रकारातील चार मास्क, साधे पाच मास्क, सॅनिटायझरची एक बॉटल, दोन डेटॉल साबण, दोन डेटॉल लिक्वीडच्या बॉटल्स, दोन डाबर गोळ्या, दोन झिदास तेलाच्या बॉटल्स, एक डझन हँडग्लोज आणि अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचा समावेश आहे.