भाजपच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस सोशल मीडियाची- अशोक चव्हाण 

प्रल्हाद कांबळे
Monday, 8 February 2021

शहरातील शंकरराव चव्हाण मेमोरीयल येथे रविवार (ता. सात) फेब्रुवारी रोजी काँग्रेस सोशल मीडियाच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा अशोक चव्हाण यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. 

नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाजात जो अपप्रचार पसरविण्यात येत आहे. त्यास सडेतोड उत्तर देण्याची जवाबदारी काँग्रेस सोशल मीडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

शहरातील शंकरराव चव्हाण मेमोरीयल येथे रविवार (ता. सात) फेब्रुवारी रोजी काँग्रेस सोशल मीडियाच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा अशोक चव्हाण यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. 

यावेळी पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, वर्तमानपत्रापेक्षाही अधिक गतीने माहिती पोहचविण्याचे साधन सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहचविताना वास्तव माहिती लोकांपर्यंत पोहचवून विश्वासाहर्ता निर्माण करणे गरजेचे आहे. भाजपसह विरोधकांच्या अपप्रचाराला अभ्यासपूर्ण माहितीतून सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. यासमवेतच समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. यागोष्टीही समाजात पोहोचविल्या पाहिजेत. जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाच्या पदाधिकार्‍यांनी अपडेट राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

या प्रसंगी माजी मंत्री डी. पी. सावंत म्हणाले की, सोशल मीडिया हे परसेप्शन बनविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियावर लोकांचा विश्वास असल्याने विश्वासपूर्ण व खरी माहिती जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. काँग्रेस सोशल मीडियाचे पदाधिकारी काँग्रेसच्या विचाराने जोडल्या गेले असल्याने वैचारिक भूमिकेतून पक्षाची बाजू मांडली गेली पाहिजे. नेहरु, गांधी व काँग्रेस विचारधारेच्या पुस्तकांचे पदाधिकार्‍यांनी वाचन करावे, ज्यामुळे काँग्रेसची विचारधारा मांडणे सोपे होईल, असे ते म्हणाले. 

यावेळी काँग्रेस सोशल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अभिजीत हाळदेकर, श्रीनिवास शिंदे, कपिल लोखंडे, सलमान बबिशार, नझिया सबा, डॉ.आर्शिया कौसर, आरिफ खान, प्रसाद हरण, पिंटू आलेगावकर, राजू बारसे, गजानन कोकाटे, गुरुनाथ पालेकर, बाबासाहेब बाबर, रुपेश पाटील, परमेश्वर कट्टे, प्रमोद भुरेवार, दत्ताहरी लोहारे, सखानंद पुरी, हरजिंदरसिंघ संधू आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress social media is responsible for giving a conclusive answer to BJP's propaganda Ashok Chavan nanded news