कोरोना @447; दिवसभरात दहा पॉझिटिव्ह रुग्ण वाढले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

दिवसभरात तीन वेळा अहवाल प्राप्त झाले. सकाळी आलेल्या अहवालात तीन रुग्ण, दुपारी दोन रुग्ण व त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पाच रुग्ण असे दिवसभरात दहा बाधित रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४४७ इतकी झाली आहे

नांदेड : प्रलंबित असलेल्या अहवालांपैकी सोमवारी (ता. सहा) दिवसभरात १४० स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात ११२ जणांचे स्वॅब निगेटिव्ह, तर दहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

दिवसभरात तीन वेळा अहवाल प्राप्त झाले. सकाळी आलेल्या अहवालात तीन रुग्ण, दुपारी दोन रुग्ण व त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पाच रुग्ण असे दिवसभरात दहा बाधित रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४४७ इतकी झाली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील चार आणि औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेले नऊ असे एकूण १३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३३४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे, तर उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने २० बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सध्या ९३ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा-  दोन महिण्यानंतर खूनाचा उलगडा... काय आहे प्रकरण वाचा...?

 या भागात आढळले रुग्ण

सोमवारी आढळून आलेले दहा रुग्णांपैकी बिलोली (चिंचाळा) एक पुरुष (वय ३५), बिलोली (आरळी) पुरुष (४३), गांधीनगर बिलोली महिला (३८), गांधीनगर बिलोली पुरुष (५२), बळीरामपूर पुरुष (६०), नायगाव तालुक्यातील बोमनाळे गल्ली येथील पुरुष (५४), मुखेड तागलेन गल्ली पुरुष (६५), नाथनगर देगलूर येथील पुरुष (३३) यांचा, तर देगलूर नाका व श्यामनगर नांदेड येथील दोघांचा यात समावेश आहे. 

हेही वाचा- Video - आॅनलाईन शिक्षणाचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी खडतरच, कसा? ते वाचाच ​

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह 

हिमायतनगर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले व नांदेडवरून ये-जा करणाऱ्या एका कार्यालयीन कर्मचाऱ्याचा शनिवारी (ता. चार) अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सहा कर्मचाऱ्यांना देखील हिमायतनगर येथे कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी किनवटच्या कंधारगल्ली, गोकुंदा येथील एक ४५ वर्षीय कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या परिवारातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी सांगितले. 

नायगावला पहिला रुग्ण 

तब्बल साडेतीन महिने सुरक्षित असलेल्या शहरातील जुन्या नायगावात ५४ वर्षीय कंत्राटदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने उमरी तालुक्यातील एका गावात जाऊन तंटा मिटविला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या बाधित व्यक्तीच्या संपर्कात उमरी तालुक्यातील काही जण आले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बाधित व्यक्तीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या कुटुंबातील १५ ते २० सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

नांदेड कोरोना मीटर-

-आज १० नवे रुग्ण
-एकुण रुग्णसंख्या- ४४७
-उपचार घेतअसलेले रुग्ण- ९३
कोरोनातुन मुक्त झालेले रुग्ण - ३३४
एकुण मृत्यू- २०
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona 447 The Number Of Positive Patients Increased During The Day Nanded News