कोरोना : बिलोली, मुखेडचे ‘ते’ बाधित बाहेरचे प्रवासी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

लोहारगल्लीतील 74 वर्षीय वृद्धाचा अहवाल येण्यापूर्वीच ७४ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी मृत्यू झाला. त्याच्या पत्नीचीही प्रकृती गंभीर असून, ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र, हे दाम्पत्य कोरोनाबाधित कसे झाले? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नांदेड : शहरात हातपाय पसरून कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडेही वळविला आहे. गुरुवारी (ता.२१) रात्री आलेल्या सहा पैकी ग्रामीण भागातील तीन बाधित रूग्ण हे मुंबई व हैद्राबाद येथून आले आहेत. त्यामुळे बाहेरून आलेले प्रवासी ग्रामीण भागात पॉझिटिव्ह निघत असल्याने गावागावात नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे कडक पालन करावे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी आवाहन केले आहे.  

मुखेड तालुक्यातील रावनकुळा येथील दोघे कामानिमित्त मुंबईच्या दहिसर भागात वास्तव्यास होते. परंतु, लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्यामुळे ते गावाकडे नुकतेच परतले होते. गावात आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. घशाचा त्रास आणि ताप दिसून आल्याने मुखेडच्या कोवीड रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वब तपासणीसाठी पाठवले असता त्यांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. 

हेही वाचा - फुलांच्या वर्षावाने काेरोनामुक्त रुग्णास सुटी

पहिला अहवाल निगेटिव्ह, तर दुसरा पॉझिटिव्ह
बिलोली तालुक्यातील केरुर येथील व्यक्ती हैद्राबाद येथून नांदेडला आला. नांदेडला काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो ऑटो करून  नरसीपर्यंत आला आणि तेथून ट्रकने बिलोलीला गेला.  लक्षणे दिसून आल्याने तो रुग्णालयात स्वतःहून दाखल झाला. त्याचा स्वब तपासणीसाठी पाठवला असता पहिला अहवाल निगेटिव्ह आला. परंतु नांदेडला तो जिथे थांबला तेथील अनेक लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व लक्षणे सुरू राहिल्याने त्याचा स्वॅब दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठवला तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला.

हे देखील वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यातील पाच पॉझिटिव्ह रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ग्रामीण भागात दक्षता आवश्‍यक
बारड, भोकर आणि मुखेडच्या कोवीड रुग्णालयात उपचार घेणारा टेंभुर्णी, ता. नायगाव येथील रहिवासी रूग्ण देखील बाहेरून आलेले प्रवासी आहेत. त्यात आणखी तिघांची भर पडली. बाहेरून आलेल्या नागरिकांना गावामध्ये क्वारंटाईन करून ठेवणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात जाऊन भेटीचा मोह आवरला नाही तर कोरोना संसर्गाचा सह प्रवासी होण्याची वेळ अनेकांवर येऊ शकते. त्यामुळे गाव पुढारी व ग्रामस्थांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
 
लोहारगल्लीतील वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज!
शहरातील लोहारगल्ली भागातील एक वृद्ध दाम्पत्य गेल्या अनेक कालावधीपासून आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच ताप व खोकलादेखील वाढत होता. उपचारासाठी  शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल  केले.

येथे क्लिक कराच - Video - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्ञानमंदिरांचा आधार, कसा? ते बघाच

परंतु, बुधवारी (ता. २० मे) सायंकाळी या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने हलविण्यात आले. लक्षणे असल्याने बुधवारी रात्री दोघांचाही स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. परंंतु, अहवाल येण्यापूर्वीच ७४ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी मृत्यू झाला. त्याच्या पत्नीचीही प्रकृती गंभीर असून, ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र, हे दाम्पत्य कोरोनाबाधित कसे झाले? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Biloli, Mukhed's 'they' affected outsiders Nanded News