कोरोना ब्रेकिंग ; रविवारी नांदेडला पाच पॉझिटिव्ह, ११ जण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

रविवारी देगलुर कोविड केअर सेंटर येथील एक व पंजाब भवन कोविड सेंटर येथील नऊ आणि सोलापूर येथे संदर्भित करण्यात आलेला पाच वर्षाचा बालक असे ११ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले

नांदेड :  शनिवारी पाठविण्यात आलेल्या स्वॅब अहवाल रविवारी (ता.पाच) प्राप्त झाला. यात पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर शनिवारी बाधित निघालेल्या एका ६५ वर्षीय महिलेचा तर, रविवारी एका ५७ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शनिवारी रात्री उशिरा मृत्यू झालेली ६५ वर्षीय महिला बिलोली येथील रहिवाशी आहे. तर देगलुर येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. रविवारी देगलुर कोविड केअर सेंटर येथील एक व पंजाब भवन कोविड सेंटर येथील नऊ आणि सोलापूर येथे संदर्भित करण्यात आलेला पाच वर्षाचा बालक असे ११ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

हेही वाचा- मातृत्व वंदना योजनेचा ४५ हजार महिलांना लाभ ​

पाच रुग्ण पॉझिटिव्ह 

रविवारी ५९ अहवाल प्राप्त झाले. यात ५२ अहवाल निगेटिव्ह तर पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. नव्याने सापडलेल्या पाच रुग्णांमध्ये तीन महिलांचा तर दोन पुरुषांचा समावेश आहे. उमर कॉलनी देगलुर नाका पुरुष (वय ३२), नवीन हस्सापूर पुरुष (वय ५९), हबिबिया कॉलनी इतवारा महिला (वय २४), मंगळवार पेठ जिल्हा हिंगोली महिला (वय २४), इदगाह रोड बिलोली येथील ६५ वर्षीय महिला असे रुग्ण आढळुन आले आहेत. १९० प्रलंबित स्वॅबची तपासणी सुरू आहे. त्याचा सोमवारी सायंकाळपर्यंत अहलवाल प्राप्त होण्याची शक्यता डॉ. भोसीकर यांनी वर्तविली आहे.

कोरोनाची संक्षिप्त माहिती 

- आज सकाळी - पाच रुग्ण पॉझिटिव्ह 
- एकूण रुग्णसंख्या - ४२८ 
- बरे झालेले रुग्ण - ३२१  
- उपचार सुरु- ८७
- मृत्यू- २०

बाधित रुग्णांची साखळी कमी होईल असे वाटत असतानाच जिल्ह्यात रोज नव्याने बाधित रुग्णांची भर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता कायम आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न होत असला तरी, पॉझिटिव्ह रुग्णसंख्या काही कमी होण्याचे नाव घेईना असेच चित्र आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडादेखील हळुहळु वाढतच आहे. 

हेही वाचा- वाटमारीचा उद्देश : रस्ता अडवून शिक्षकाला मारहाण

गावात सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार

शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गाव खेड्यांना कोरोनापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरी, त्यास पुरेशे यश येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गावच्या सुरक्षेसाठी आणखी कुठले पावले उचलता येतील यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टर मंडळीकडून व्यक्त केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Braking Five Positive 11 Corona Free In Nanded On Sunday Nanded News