Corona Breaking ; नांदेडात गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वोच्च नोंद 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

एकाच दिवशी २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले होते. त्यानंतर गुरुवारी दिवसभरात २१ रुग्ण आढळुन आल्याने आत्तापर्यंतची जिल्ह्यातील सर्वोच्च रुग्णांची नोंद गुरुवारी झाली. दिवसभरात नांदेडला ‘दे धक्का’ अशी स्थिती झाल्याचे पहावयास मिळले. 

नांदेड ः एकीकडे नांदेडकरांची गुरुवारची सकाळ पावसाने दिलासादायक ठरली तेव्हांच पाच पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने नागरिकांना एक धक्का बसला. या धक्क्यातून सावरायच्या आधीच पुन्हा सायंकाळी आलेल्या अहवालात अजून १६ रुग्णांची भर पडली. यापूर्वी एकाच दिवशी २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले होते. त्यानंतर गुरुवारी दिवसभरात २१ रुग्ण आढळुन आल्याने आत्तापर्यंतची जिल्ह्यातील सर्वोच्च रुग्णांची नोंद गुरुवारी झाली. दिवसभरात नांदेडला ‘दे धक्का’ अशी स्थिती झाल्याचे पहावयास मिळले. 
  
बुधवारी प्रलंबित असलेल्या ८९ संशयित व्यक्तींचा स्वॅब अहवालांपैकी गुरुवारी (ता.११) सकाळी आणि सायंकाळी दोन टप्यात ६१ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात सकाळच्या अहवालात पाच आणि सायंकाळी पुन्हा १६ असे दिवसभरात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. यामुळे नांदेड जिल्ह्याची कोरोना बाधित रुग्णसंख्या २२४ झाली आहे. 

हेही वाचा- नांदेडकरांनी सोळा दिवसात साडेअकरा लाख लिटर दारु रिचवली

या भागातील रुग्णांचा समावेश

तसेच दुसरीकडे पंजाब भवन यात्रीनिवास येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. गुरुवारी आढळलेल्या रुग्णात चौफाळा भागातील ५२ वर्षीय महिला, फरांदेनगरातील ५२ वर्षीय पुरुष, खोज्या कॉलनीतील ६७ वर्षीय पुरुष, उमर कॉलनीतील १६ वर्षीय युवक, इतवारा भागातील पाच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार पुरुषांचा समावेश असून, त्यांचे वय १६, २६, २८ आणि ६२ वय तर ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर गुलजार बागेतील आठ व्यक्तीपैकी तीन पुरुष ज्यांचे वय ३५, ४१ आणि ३८ तर पाच महिलांमध्ये तीन आणि दहा वर्षाच्या दोन मुलींचा समावेश तर, तीन महिला ज्यांचे वय २८, ३० आणि ३८ असे आहे. या शिवाय मुखेड शहरातील होळकरनगर व विठ्ठलनगर परिसरातील एक अशा दोन ४५ आणि ५५ वर्षाच्या पुरुषांचा यात समावेश आहे. 

बुधवारी (ता.दहा) दिवसभरात दोघांचा मृत्यू तर दहा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढत जाणारा हा आकडा कुठेतरी थांबेल असे वाटत असतानाच रोज नव्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने नांदेडकरांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे इतके दिवस ‘कोरोना’ असे नाव घेतले तरी घरात बसणारे नांदेडकर आता मात्र बिनधास्तपणे शहरातील रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. लहान मोठ्या दुकानांवरदेखील सॅनिटायझर किंवा समांतर अंतर राखले जात नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे.

हेही वाचा-  फुले विक्रेत्यांवर इतर व्यवसाय करण्याची वेळ, कशामुळे? ते वाचाच

शहरातील कंटेन्मेंट झोन हा नावालाच​

ज्या भागामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला, तो भाग सील केला जातो. इतवारा, अबचलनगर, पीरबुऱ्हाणनगर येथे सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे सुरुवातीच्या काळात कंटेन्मेंट झोनमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. शिवाय त्या घराच्या व परिसराचा भाग बंद करण्यात येत होता. त्यामुळे त्या परिसरातील कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. म्हणून आरोग्य विभागालादेखील सर्व परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करणे सहज शक्य होत असे. परंतु, मागील काही दिवसांपासून शहरातील कंटेन्मेंट झोन हा नावालाच केला जात असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. कारण, कन्टेन्मेंट झोनमधीलच अनेक नागरिकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत.

कोरोना मीटर
एकूण पॉझिटिव्ह - २२४
उपचार घेत असलेले - ७४
उपचारानंतर घरी परतलेले - १३९
मृत्यू - ११
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking The Highest Number Of Positive Patients Was Recorded In Nanded On Thursday Nanded News