नांदेडमधील गणेश मुर्तिकारांवर कोरोनाचे संकट

प्रल्हाद कांबळे
Friday, 24 July 2020

नोव्हेंबर- डिसेंबर महिण्यात तयार करण्यात आलेल्या सात फुट उंचीच्या गणेशमुर्ती विकण्यास परवानगी द्यावी, मुर्तिकार संघटना, नांदेड.

नांदेड : संबंध जगावर आलेले कोरोनाचे संकट काही केल्या कमी होत नसल्याचे पहायवयास मिळत आगहे. जगातील महासत्ता या विषाणूमुळे त्रस्त असून त्याचा धोका आपल्या देशालाही बसत आहे. या महामारी मुळे बहुतांश व्यवसाय डबघाईला आले आहेत. व्यवसाय करणाऱ्यावर तर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून चार फुटांपर्यंत मूर्ती विकण्याचे परिपत्रक शासनाने काढल्याने नांदेड जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका मूर्तिकार व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजूर वर्गावर बसलाय. तयार सात फुट उंचीच्या मुर्ती विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मुर्तिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्ह्यात जवळपास साडेचारशे मूर्तिकार असून त्यापैकी दोनशेच्या आसपास मूर्तिकार शहर व परिसरात असलेल्या कारखान्यात काम करतात. नांदेडच्या मूर्तीपैकी ७० टक्के मुर्ति ह्या नांदेड लगत असलेल्या तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील विविध शहरांमध्ये जातात. त्यामुळे नांदेड येथील मूर्तिकार लहान मूर्तीबरोबरच पाच ते १२ फूट उंचीच्या मूर्ती बनवतात. या मूर्तीची मागणी अधिक असल्याने राजस्थान, मुंबई येथून कच्चामाल आयात करून नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये मूर्ती बनवण्याच्या कामास प्रारंभ करतात. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांना हादरा : बनावट बियाणांसोबत आता हरणांच्या टोळधाडीचे संकट

नांदेडच्या मुर्तीला परराज्यात मागणी 

कच्च्या मालाचा तुटवडा, मजुरांची होणारी वानवा अशा अडचणी लक्षात घेऊन अगोदरच मूर्ती बनविण्यात येतात. परंतु यंदा मार्च महिन्यातच कोरोनाचे संकट आल्याने मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत. त्यातच शासनाने मुंबईतील गणेश मुर्तिकारांशी चर्चा करून चार फुटांपर्यंत मूर्ती तयार करून      विक्री करण्याचे परिपत्रक काढले आहे. परंतु सदर परिपत्रक काढायचे अगोदर राज्यभरात लाखो मूर्ती चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या तयार केल्या गेल्या. त्या मूर्तीचे मूर्तिकारांनी करायचे काय असा प्रश्न मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजेंद्रसिंग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

मुर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजेंद्रसिंह ठाकुर यांनी केली मागणी 

दरम्यान कर्ज काढून व्यवसायास म्हणजेच कच्चामाल, वॉटर पेन्ट आदी साहित्य राजस्थान, मुंबईतून मागविले जाते. गुंतवलेले भांडवल कुठून काढायचे असा प्रश्न मूर्तिकारांकडून उपस्थित केला जात आहे. सन २०१९ मध्ये मूर्तीवर बंदी घातलेल्या या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.    परंतु तयार असलेल्या चार फुटापेक्षा अधिक मूर्ती पर्यावरण विभागाच्या अध्यादेशाने २०१९ मध्ये विक्री करता येणार नाहीत. यंदाही त्या मूर्ती विक्री करावयाच्या नाही. तर त्या मूर्तीचे मूर्तिकारांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. २०१९ पासून मूर्ती विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चार फुटांपर्यंत या मूर्ती विक्री करण्याचे परिपत्रक मुंबईच्या मूर्तिकार यांच्याशी चर्चा करून काढले. जिल्ह्यातील बहुतांश मुर्तिकार नोव्हेंबर- डिसेंबर महिण्यातच तयार केले आहेत. यासोबतच कमीत कमी सात फुटापर्यंतच्या मुर्ती विक्री करण्यास परवानीग द्यावी अशी मागणी श्री. गणपती मुर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजेंद्रसिंह ठाकुर यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona crisis on Ganesh sculptors in Nanded