कोरोना : आयुर्वेद औषधीसोबतच ‘खेकडा अर्क’ काढ्याला मागणी 

रामराव मोहिते
Monday, 21 September 2020

ग्रामीण भागात आजही घरगुती उपाय म्हणून ‘ खेकड्याच्या अर्क काढ्याला ’ अधिकची पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. एरव्ही खाण्यासाठी मुर्दाड समजल्या जाणाऱ्या ‘ खेकड्याला ‘ बाजारात मोठी मागणी.

घोगरी (जिल्हा नांदेड) : कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या संकटामुळे आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे यासाठी, ग्रामीण भागात आजही घरगुती उपाय म्हणून ‘ खेकड्याच्या अर्क काढ्याला ’ अधिकची पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. एरव्ही खाण्यासाठी मुर्दाड समजल्या जाणाऱ्या ‘ खेकड्याला ‘ बाजारात मोठी मागणी वाढल्याने या विक्रीतून या भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच ग्राहकांमधून मागणी वाढत चालली आहे. 

गेल्या सहा महिन्यापासून आपल्या देशावर कोरोना विषाणूचे भयावह संकट ओढवले. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन करूनही याचे लोन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने, जनतेतून भीती व्यक्त होत आहे. ताप, सर्दी, खोकला या लक्षणापासून आपल्या कुटुंबाचा व आपला बचाव व्हावा यासाठी नागरिकांच्या वतीने घरगुती उपाय म्हणून कडुलिंब, तुळस, बेल, कावळ वेल, गुळवेल, सूट, लवंग, काळी मिरी, हळद, जायफळ, लसुन, बेहडा, जाईच्या पानांचा रस, ओवा, एरंडेल, निर्गुंडीच्या पानाचा शेक आदी निसर्गदत्त वनसंपदेपासून मिळणाऱ्या वृक्षाचा अर्क काढा आपल्या दैनंदिन आहारात नित्याने वापर होताना दिसत आहे. यामुळे पुन्हा आयुर्वेदातील संजीवनी औषधीला अनन्य महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - धक्कादायक : शांतीधाम पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरच अंत्यविधी -

खोकल्यासाठी ‘खेकडा अर्क’ महत्वपूर्ण 

या परिसरात गेल्या आठ दिवसापासून सारखा पाऊस सुरू असल्याने वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे, सर्दी, ताप, खोकल्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. नागरिक मात्र कोरोनाच्या भीतीने रुग्णालयात न जाता घरगुती उपाया वरच अधिक भर देताना दिसत आहेत. एरव्ही खाण्यासाठी मुर्दाड समजला जाणारा ( रक्त नसणे) शिवाय या परिसरात नदी, ओढे, तलाव, यात सर्रासपणे मिळणाऱ्या खेकड्याला म्हणावे तसे महत्त्व नव्हते. परंतु सर्दी, खोकल्यासाठी ‘खेकडा अर्क’ महत्वपूर्ण मानला गेल्याने खेकड्याला बाजारात मोठी मागणी वाढली आहे. केवळ पन्नास रुपयात दोन नग मिळणारे खेकडे आता दोनशे ते तीनशे रुपये देऊनही मिळत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे नदीकाठी वास्तव्यास असलेल्या मजूरदाराचे यामुळे आयतेच फावले आहे. यातून त्यांना भरपूर रोजगार मिळत असल्याने, तूर्तास तरी त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटलेला दिसत आहे.

बिन भांडवली धंदा 

गोदावरी नदीच्या काठी, पैनगंगेच्या तीरावर मुबलक खेकडे मिळत असल्याने, खेकडे पकडणारे कुशल मजूरदाराने अपला ठिया याठिकाणी मांडला आहे. इतर ठिकाणांपेक्षा याठिकाणी खेकडे स्वस्त दरात मिळत असल्याने  व्यापाऱ्यांना यातून रोजगार मिळत असल्याने खेकडे घेण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडताना दिसत आहे. हा बिन भांडवली धंदा परवडणारा आहे.
गजानन खरात, खेकडा विक्रेता, घोगरी, ता. हदगाव.

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Demand for extract of 'crab extract' along with Ayurvedic medicine nanded news