कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील २६७ ग्रामपंचायतीवर प्रशासक

प्रल्हाद कांबळे
Sunday, 25 October 2020

मात्र निवडणूक विभागाच्या मार्दर्शक तत्वानुसार ह्या निवडणूका तुर्त तरी घेता येणार नसल्याने या ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. 

नांदेड : कोरोनामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर संबंध जगभरातील कार्यक्रम बदलले आहेत. या आजाराचा प्रादूर्भाव कमी व्हावा यासाठी शासनाने लॉकडाउनचा पर्याय निवडला. परंतु कोरोनाला काही आवरता आला नाही. यातच नांदेड जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्यात मुदत संपत असलेल्या २६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका कार्यक्रम हाती घेण्यात येणार होता. मात्र निवडणूक विभागाच्या मार्दर्शक तत्वानुसार ह्या निवडणूका तुर्त तरी घेता येणार नसल्याने या ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. 

ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्ह्यातील २६७ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. मुदत संपल्याने या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे आवश्यक आहे. मात्र कोरोना महामारीमुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सद्यस्थितीत घेता येत नसल्याने प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदश जारी केले आहे.

हेही वाचा -  नांदेड : रेणुका मंदिरात ४७ लाखांचा अपहार, माजी संचालकांवर गुन्हा दाखल -

या तालुक्यातील ग्रामपंचायती

यामध्ये अर्धापूर तालुक्यातील- ११ ग्रामपंचायती, भोकर- सात, बिलोली- २५, देगलूर- ४१, धर्माबाद- १९, हदगाव -१८, हिमायतनगर- आठ, कंधार- ३६, किनवट- सात, लोहा- २९, मुदखेड- एक, मुखेड- २६, नायगाव- २९ आणि उमरी तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकाची नियुक्ती करताना शासन आदेशानुसार विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता आदी प्रवर्गातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. पुढील आदेशापर्यंत हे प्रशासन ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत. मुदत संपल्याने संबंधित ग्रामपंचायतीचे विकास कामे करण्याची भीती होती. मात्र सर्व २६७ ग्रामपंचायतीवर प्रशासन नियुक्तीचे आदेश दिल्याने या गावातील विकास कामे पुन्हा सुरू होण्यास मदत मिळणार आहे.

येथे क्लिक करा -  अवांतर वाचनानेच येते शहाणपण : डॉ. सुरेश सावंत -

या आहेत महत्वाच्या ग्रामपंचायती

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. परंतु कोरोनामुळे त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले. जिल्ह्यातील आंबेगाव, भोगाव, खैरगाव, पिंपळगाव, शेलगाव, सिद्धगिरी, गंजगाव, हजापूर, कवठा, मुतन्याळ, पिंपळगाव, सगरोळी, आलूर, भायगाव, चैनपुर, कारेगाव, केदारकुंठा, माळेगाव, मरखेल, सांगवी, शेळगाव, सुगाव, तमलूर, वन्नाळी, बामणी, चोंडी, जारिकोट, पाटोदा, शिरखेड, आष्टी, चिंचोली, मनाठा, कोळी, पिंपरखेड, वाळकी, बोरगाव, धानोरा, जवळगाव, पोटा, आलेगाव, चिखलभोसी, हळदा, मंगलसांगवी, मसलगा, फुलवळ, रहाटी, सावळेश्वर, शेकापुर यासारख्या अनेक मोठ्या ग्रामपंचायती आहेत, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect: Administrator on 267 gram panchayats in Nanded district nanded news