भजनी वाद्य कारागीरांवर कोरोना इफेक्ट 

प्रमोद चौधरी
Sunday, 23 August 2020

कारागीर वादकांच्या मागणीनुसार तबला, पखवाज व ढोलकी बनवत असतात. त्यासाठी लागणारे चामडे शोधणे, त्यावर प्रक्रिया करणे आदी खूपच जिकिरीचे असते. तसेच ते बनविणे हेही शारीरिकदृष्ट्या कष्टाचे असल्याचे कारागीर सुदाम साबळे यांनी सांगितले. 

नांदेड : भजन कलेमध्ये महत्त्वाची साथ देणारी चर्मवाद्ये दुरुस्ती व बनविण्याचे काम गणेशोत्सव सुरु झालातरी ठप्पच आहे. कारण गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासूनच घरोघरी चर्मवाद्यांचे आवाज ऐकू येतात. यंदा मात्र, कोरोनामुळे हे आवाज बंदच राहणार असल्याने वाद्य दुरुस्त करणारे कारागीरही संकटात आले आहेत. 

गणोशोत्सवामध्येच नाहीतर भजन हा प्रकार वर्षभरच सुरु असतो. परंतु, गणेश चतुर्थीला गणरायाच्या स्वागतासाठी भजन मंडळांची संख्या वाढलेली असते. अलिकडे तबला व पखवाज शिकविण्याचे क्लासेस ठिकठिकाणी सुरु आहेत. त्यामुळे लहान मुलांबरोबरच तरुणांचाही तबला व पखवाज शिकण्याकडे कल वाढला आहे. नवीन भजनी मंडळाची निर्मिती झाल्याने तबला, पखवाज, ढोलकी यांची मागणीही अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कारागीर वादकांच्या मागणीनुसार तबला, पखवाज व ढोलकी बनवत असतात. त्यासाठी लागणारे चामडे शोधणे, त्यावर प्रक्रिया करणे आदी खूपच जिकिरीचे असते. तसेच ते बनविणे हेही शारीरिकदृष्ट्या कष्टाचे असल्याचे कारागीर सुदाम साबळे यांनी सांगितले.

हेही वाचा -  Video - संगीत शब्द ऐकल्याने मन का होते उल्हासित, वाचाच तुम्ही
 
गणेशोत्सवात असते भजनाची पर्वणी 
वाद्य बनविणे जिकिरीचे असलेतरी तमा न बाळगता कारागीर कितीही कष्ट पडले तरी बाप्पाची सेवा मानून वादकांना त्यांच्या मनाप्रमाणे वाद्ये बनवून देतात. भाविकांबरोबर रसिकांसाठीही गणेश चतुर्थी उत्सवामध्ये भजनाची एक पर्वणीच असते. या संगीतमय भजनाचा आस्वाद घेत रसिक तृप्त होतात. आणि हेच भजनी कलाकारांना कौतुकाची थाप खूप मोलाची वाटते. 

हे देखील वाचाच - दोनशे रुग्णांची शनिवारी कोरोनावर मात, नऊ जणांचा मृत्यू; १२२ जण पॉझिटिव्ह

तबली, मृदंगाचा नाद एकू येईना
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी तबला, पखवाज दुरुस्त करणाऱ्या कारागीरांसोबतच भजनी मंडळांचीही विद्ये दुरुस्त करण्याची लगबग असते. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भजनी साहित्यांची दुरुस्ती करण्यासाठी मंडळांची धावपळ दिसली नाही. गणेशोत्सवाच्या एक महिना अगोदरपासून मृदुंग, तबला साहित्य दुरुस्ती दुकानांमध्ये नाद घूमू लागतात. गणेशोत्सवामध्ये ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण असते. घराघरांमध्ये आरती, भजने असे कार्यक्रम होतात. त्याची पूर्वतयारी म्हणून पेटी, मृदंग, डगा, ढोलकी अशा साहित्यांची दुरुस्तीच्या कामांना जोर चढतो. यासाटी स्थानिकसह जिल्ह्याबाहेरूनही येणारे कारागीर या कामात गुंतलेले असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे तबला, मृदंगाचा नाद काही ऐकायला मिळत नाही. 

येथे क्लिक कराच - विद्यार्थ्यांना गुड न्यूज : अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
 
शासनाने सहकार्य करावे 
भजनामध्ये संवादिनीबरोबरच चर्मवाद्यांना खूप महत्त्व आहे. चर्मवाद्यांशिवाय भजनातील गोडी अपूर्ण असते. उत्कृष्ट चर्मवाद्याच्या जोरावर तब्बलजी किंवा मृदंगमणी रसिकांची वाहवा मिळवतात. या सर्वांना वाहवा मिळण्यासाठी कष्ट घेऊन तबला, पखवाज, ढोलकी व संवादिनी आदी वाद्ये बनविण्याच्या कामे कोरोनाच्या महामारीमुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे पडद्यामागील कलाकारांसाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा कारागिरांनी व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect On Bhajan Instrumentalists Nanded News