esakal | कोरोना इफेक्ट - नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

एसटी सुरु होऊन बरेच दिवस झाले तरी आजदेखील त्या प्रमाणात प्रवाशी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. अनेक लांब पल्ल्याच्या बस अद्याप सुरु करण्यात आल्या नाहीत.

कोरोना इफेक्ट - नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना संसर्गाचा एसटी महामंडळास देखील फटका बसला. मागील वर्षी नांदेड विभागाचे ता. एक ते ता. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत आठ कोटी ६१ लाख चार हजार एवढे उत्पन्न झाले होते. यंदा चालू वर्षात ता. एक ते ता. २० ऑक्टोबर २०२० दरम्यान केवळ पाच कोटी ६७ लाख ४० हजार इतके उत्पन्न झाले. त्यामुळे नांदेड विभागास कोरोना संसर्गामुळे दोन कोटी ९४ लाख चार हजार रुपयांचा फटका बसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. 

महाराष्ट्र राज्य मार्ग एसटी महामंडळाची लालपरी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अडथळे पार करत प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. मात्र, अजूनही एसटीच्या वाटेतील अडथळे काही कमी झाले नाहीत. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी देखील अतिशय कमी वेतनावर समाधान मानत कर्तव्य बजावत आहेत. 

हेही वाचा- राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार करणार - नरेंद्र पाटील

वीस दिवसात विभागातून केवळ ३१८ नियते 

गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये एसटी महामंडळाच्या नांदेड विभागाने नांदेड, भोकर, किनवट, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली, माहूर या नऊ आगारातून ३४ लाख २७ हजार किलोमीटर बस धावली होती. यावर्षी मात्र कोरोना संसर्गामुळे अनेक जण प्रवास करण्याचे टाळत आहेत. एसटी सुरु होऊन बरेच दिवस झाले तरी आजदेखील त्या प्रमाणात प्रवाशी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. अनेक लांब पल्ल्याच्या बस अद्याप सुरु करण्यात आल्या नाहीत. गेल्या वीस दिवसामध्ये नांदेड विभागातून केवळ ३१८ नियते चालविण्यात आली आहेत. यातून २५ लाख ४२ हजार किलोमीटर पूर्ण केले आहे. हे प्रमाण मागील वर्षापेक्षा पावणेनऊ टक्के इतके कमी आहे. 

हेही वाचले पाहिजे- आंध्र, तेलगंणात शंभर विशेष रेल्वे तर मराठवाड्यात केवळ तीन ​

लांब पल्ल्याच्या मार्गावर लवकरच बससेवा 

दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर नांदेड विभागातुन अनेक लांब पल्ल्याच्या मार्गावर लवकरच बससेवा सुरु करण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल. अनेक मार्गावर बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच एसटी बस सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन घेऊन थेट विभागीय अधिकारी यांच्याकडे याचना करत आहेत. 

महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करा
कोरोनाचा प्रादूर्भाव घटल्याने प्रवाशाकडून हळूहळू प्रतिसाद वाढत आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी दसरा - दिवाळीच्या तोंडावर लवकरच लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी खासगी वाहनाने प्रवास न करता एसटी बस महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करावा. 
- अविनाश कचरे, विभागीय नियंत्रक अधिकारी, नांदेड. 
 

loading image