esakal | राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार करणार - नरेंद्र पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

 नरेंद्र पाटील

राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी (ता. २० आॅक्टोंबर) नांदेडला दिली. राज्यात गेल्या दोन वर्षांत १९ हजार १८० उद्योजक तयार झाले असून आतापर्यंत एक हजार १६४ कोटी रुपयांचे कर्जही वाटप करण्यात आले आहे. त्यात ६० कोटी रुपयांचा व्याज परतावाही केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार करणार - नरेंद्र पाटील 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने एक लाख मराठा उद्योजक तयार करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी (ता. २०) दिली.
 
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आले आहेत. या निमित्ताने त्यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याचबरोबर मंगळवारी आणि बुधवारी ते मराठा समाजातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबतही बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. 

हेही वाचा - नांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष

मराठा समाजात उद्योजक तयार व्हावेत
मराठा समाजात उद्योजक तयार व्हावेत, यासाठी महामंडळातर्फे पुढाकार घेण्यात येत असल्याचे सांगून श्री पाटील म्हणाले की, महामंडळातर्फे शंभर टक्के आॅनलाइन व्यवस्था असून त्याद्वारे कर्ज देण्यात येत असल्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शक आहेत. सध्या तीन वेगवेगळ्या प्रकारे कर्ज देण्याची योजना आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक ते दोन समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. मराठा समाजातील तरुणांना तसेच शेतकऱ्यांना आणि महिलांना देखील शेतीपूरक व्यवसायास शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदींसाठी तसेच तरुणांना किराणा दुकान, हॉटेल त्याचबरोबर इतर व्यवसायासाठी कर्ज देण्यात येत आहे. 

१९ हजार १८० उद्योजक झाले तयार
महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर गेल्या दोन वर्षांत १९ हजार १८० उद्योजक तयार झाले असून आतापर्यंत एक हजार १६४ कोटी रुपयांचे कर्जही वाटप करण्यात आले आहे. त्यात ६० कोटी रुपयांचा व्याज परतावाही केला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात २४८ जणांना १५ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले असून ६६ लाख रुपयांचा व्याज परतावाही आला आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - वसुलीसाठी बँकांचा एकही माणूस शेतकऱ्यांकडे फिरकला नाही पाहिजे, याची खबरदारी सरकारने घ्यावी 

मराठा समाजाचा प्रतिसाद
राज्यात औरंगाबाद, नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बीड आदी जिल्ह्यांतही चांगला प्रतिसाद असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात इतर महामंडळाच्या तुलनेत हे यश उल्लेखनीय आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महामंडळाला ७० कोटी रुपये मिळाले होते. आता महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मंत्र्यांनी देखील महामंडळासाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या काळातही महामंडळाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून फारशी अडचण आली नसल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी कौशल्य विकास आणि प्रशिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, महामंडळाचे नांदेडचे समन्वयक शुभम सेवनकर, उमेश पाटील आदी उपस्थित होते.