esakal | कोरोना इम्पॅक्ट : अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांची कोल्हापूरला तडकाफडकी बदली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

. त्यांच्या जागेवर अंबेजोगाई येथील डॉ. सुधीर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांनी दिली आहे

कोरोना इम्पॅक्ट : अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांची कोल्हापूरला तडकाफडकी बदली

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची रविवारी (ता. २६) तडकाफडकी कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर अंबेजोगाई येथील डॉ. सुधीर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांनी दिली आहे. 

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू दर वाढल्याने व अधिष्ठाता यांच्या विरोधात सामान्य जनतेपासून ते लोकप्रतिनिधी यांनी देखील वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के आपल्या कामाप्रती प्रामाणिक असले तरी, लोकप्रतिनिधीचे फोन न उचलणे, त्यांना प्रतिसाद न देणे, रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्‍न असे इतर अनेक विषय त्यांना योग्यरित्या हाताळता आले नाही अशी चर्चा सुरू आहे. विशेष करुन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती हाताळण्यात देखील ते अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनामृत्यू प्रकरणी डीनची बदली

ता. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ 690 बाधित रुग्ण संख्या होती. परंतु मागील पंधरा दिवसात आकडेवारी दुप्पट झाली असून ता. 25 जुलैपर्यंत जिल्ह्यात एक हजार 252 इतके लग्न रुग्ण वाढले, तर या दरम्यान दर दिवसाला दोन किंवा त्यापेक्षा अधिक बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा - धक्कादायक : शेवटसुद्धा चांगला नाही, यांच्या गलथान कारभारामुळे करावा लागला ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार

कोरोनाचा कहर भोवला

सध्या पॉझिटिव्ह रुग्ण पंजाब भवन कोविड सेंटर, गुरु गोविंदसिंग स्मारक जिल्हा रुग्णालय यासह विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय अशा तीन ठिकाणी बाधित रुग्णांना दाखल करण्यात येत असून यातील कोरोनाची गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना दहा दिवसापर्यंत पंजाब भवन येथे निरिक्षणाखाली ठेवण्यात येत असून, ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह (शुगर) व श्वास घेण्यास तकलीफ होत असेल अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करण्यात येत आहेत. परंतु या दरम्यान रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याने मागील काही दिवसापासून बाधित रुग्णांची मृतांची संख्या वाढत असल्याने लक्षात घेता अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 513 बाधित रुग्णावर औषध उपचार सुरु असून 672 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर आत्तापर्यंत 56 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे