कोरोना संक्रमण : पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी बाधीत

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 23 September 2020

अधीक्षक अभियंत्याच्या चालकासह अधिकारी व कर्मचारी बाधीत झाल्याने अकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागले.

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सर्वच क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचा शिरकाव आता पाटबंधारे विभागात झाला आहे. अधीक्षक अभियंत्याच्या चालकासह अधिकारी व कर्मचारी बाधीत झाल्याने अकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागले. सर्वसामान्यांच्या थेट संपर्कात नसलेल्या या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला याबाबत तर्क वितर्क केल्या जात आहे. 

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारी (ता. २३) टेस्ट करण्यात आल्यानंतर काही अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यामध्ये अधीक्षक अभियंता यांचे वाहन चालकासह कोरोना बाधित आल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. कोरोनाने आपले पाय सर्वच क्षेत्रात पसरले आहेत. रुग्णसेवेत योगदान देणाऱ्या डॉक्टर, पोलिस, पत्रकार, बँक, महावितरण, महसूल यंत्रणा यातून सुटली नाही.

हेही वाचा -  गुड न्यूज : नांदेड कारागृहातील ७४ कैदी कोरोनामुक्त -

आजाराचा टक्का दिवसेंदिवस वाढतच आहे

जनतेत जसे संक्रमण वाढत आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा भेडसावत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या संक्रमणाने घेरले होते. स्वतः जिल्हाधिकारी सुद्धा या संक्रमणाचे शिकार झाले होते. या आजाराचा टक्का दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने वातावरण गंभीर बनले आहे. जिल्हा परिषदप्रमाणे पाटबंधारे विभागाने मंडळांतर्गत असलेल्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करून घेतली.

अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधीत 

नांदेड मंडळांतर्गत कार्यालयात सरसकट झालेली तपासणी खळबळ उडवून देणारी ठरली आहे. या विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तपासणीनुसार पाटबंधारे विभागाचा वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधीत झाले आहेत. जनतेचा थेट संपर्क नसलेल्या विभागात कोरोनाने खळबळ उडवून दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection: Irrigation department officials, staff infected nanded news