कोरोनाचा सामना : नांदेडात आता मिशन ब्रेक द चेन 

file photo
file photo

नांदेड : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात मिशन ब्रेक द चेन अंतर्गत ( Mission break the chain ) आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशाची जिल्हाभर कडक व काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल.  

 निर्गमीत केलेल्या आदेशान्वये 31 जुलै 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्‍या अधिन राहून आस्‍थापना व दुकाने केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच चालू ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. अत्यावश्यक साधने व सुविधा यांनी साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध सर्वसंबंधित यंत्रणांमार्फत कठोर कारवाई केली जाईल. 
 
पुर्णता बंद करुन 100 टक्के ताळेबंदी करण्‍याची मागणी

नांदेड जिल्‍हयात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व रुग्‍णांची संख्‍या विचारात घेता निर्गमीत आदेशाची काटेकोर अंमलबजावणी काही ठिकाणी होत नसल्‍याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याचबरोबर काही लोक दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करत असल्याने जनतेमधूनही दिलेली शिथीलता पुर्णता बंद करुन 100 टक्के ताळेबंदी करण्‍याची मागणी होत आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करुन जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खास पथके तयार करुन ठिकठिकाणी तपासणी पथक निर्माण केली आहेत. या पथकांमार्फत जिल्ह्यात सर्व निर्देशाचे तंतोतंत पालन जर कोणी केले नाही तर अशा तपास पथकांना आढळलेल्या व्यक्तीविरुद्ध आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.

वेगवेगळ्या पथकात अधिकारी

महानगरपालिका हद्दीत आयुक्त नांदेड, पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी नांदेड. नगरपालिका-नगरपंचायत हद्दीत उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, मुख्‍याधिकारी, पोलीस निरीक्षक. ग्रामपातळीवर ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस, कृषी सहाय्यक इत्‍यादींचा नवीन निर्माण केलेल्या वेगवेगळ्या पथकात समावेश राहील.  

कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कार्यवाही केली जाईल

सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीमध्ये जर दुचाकीवर एक व्‍यक्‍ती पेक्षा अधिक व्‍यक्‍ती आढळल्‍यास 500 रुपये पर्यंत दंड व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कारवाई केली जाईल. तीन चाकी रिक्षा व इतर वाहनात तीन व्‍यक्‍ती पेक्षा अधिक व्‍यक्‍ती आढळल्‍यास 1 हजार रुपये पर्यंत दंड व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कार्यवाही केली जाईल. चार चाकही वाहनामध्ये तीन व्‍यक्‍ती पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्‍यास 1 हजार रुपये दंड, व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कार्यवाही. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्‍क परिधान न केल्यास व  सामाजिक अंतराचे पालन न केल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्‍यास 1 हजार रुपये  दंड ठोठावला जाईल. ताळेबंदीच्‍या कालावधी मुभा देण्यात आलेल्‍या विविध दुकानात पाच पेक्षा जास्‍त ग्राहक, दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्‍या चेहऱ्यावर मास्‍क, सामाजिक  अंतराचे पालन न झाल्‍याचे आढळून आल्‍यास रुपये 5 हजार रुपये पर्यंत दंड व सदरचे दुकानही पुढील पाच दिवसासाठी सिल करण्‍यात येईल. 

मुभा दिलेली वस्‍तू विक्री करणाऱ्यांना एकाच ठिकाणी करावी

हातगाडेवरती फळ व भाजी विक्री तसेच इतर मुभा दिलेली वस्‍तू विक्री करणाऱ्यांना एकाच ठिकाणी थांबवून  विक्री न करता त्‍यांना मुभा दिलेल्‍या वेळेत गल्‍ली, कॉलनी, सोसायटीमध्‍ये जावून विक्री करावी. एकाच  ठिकाणी त्यांनी थांबवून विक्री केल्‍यास अशी वाहने, हातगाड्यांना  1 हजार रुपये दंड व वेळ प्रसंगी जप्‍तीची कार्यवाही सुध्दा करण्‍यात येईल. अंतरराज्‍य सिमेतून केवळ वैद्यकीय, अत्‍यंत तातडीच्‍या कारणासाठी परवाना घेतलेल्‍या व्‍यक्‍तींना व मालवाहतूक वाहनांनाच प्रवेश असेल.

संशयी तात्‍काळ शासकिय विलगीकरण केंद्रात दाखल करावे

ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात परदेशातून, परराज्‍यातून व जिल्‍हयाबाहेरुन प्रवास करुन आलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या बाबतीत यापुर्वी गठीत केलेल्‍या अॅन्‍टी कारोना कवच / फोर्सद्वारे खालील प्रमाणे कार्यवाही अनुसरण्‍यात यावी. यात अशा व्‍यक्‍तीची वैद्यकीय पथक येईपर्यंत गावातील समाज मंदिर, शाळा इत्‍यादी वेगळ्या ठिकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. सदर व्‍यक्‍तींची तात्‍काळ सबंधित वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करुन घेण्‍यात यावी. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या सल्‍यानूसार, सदर व्‍यक्‍तीस प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आली नसल्‍यास त्‍यास गृह अलगीकरण करावे किंवा तशी व्यवस्था नसल्‍यास त्‍यास नजीकच्‍या कॅम्‍पमध्‍ये किंवा गावातील समाज मंदिर, शाळा याठिकाणी राहण्‍याची व जेवणाची व्‍यवस्‍था करावी. तपासणीमध्ये प्रादुर्भावाची लक्षणे किंवा संशयास्‍पद स्थिती आढळून आल्‍यास त्‍यांना तात्‍काळ शासकिय विलगीकरण केंद्रात दाखल करावे.

शिक्षेस पात्र

जिल्‍ह्यातील सर्व खाजगी रुग्‍णालयात तसेच गल्‍लीतील, कॉलनीतील व वसाहतीमधील जनरल फिजीशन यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्‍या रुग्‍णामध्‍ये कोव्हिड-19, सारी व ILI (Influanza like illness ) सारखे लक्षण दिसून आल्‍यास तात्‍काळ नजीकच्‍या आरोग्‍य अधिकाऱ्यांना माहिती देवून सदर व्‍यक्‍तीस पुढील उपचारास त्‍यांचेकडे पाठवावे. असे न केल्‍याचे आढळून आल्‍यास सबंधित डॉक्‍टर विरुध्‍द नियमानुसार कार्यवाही अनुसरली जाईल. रस्‍त्‍यावर, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण व्‍यक्‍ती, व्‍यक्‍तींचा समुह वावरत, फिरत असल्‍याचे दिसून आल्‍यास त्‍यांच्या विरुध्‍द भारतीय दंड संहिता 188 व इतर अधिनियमानुसार शिक्षेस पात्र धरले जाईल. 

सात ते बारा जूलै पर्यंत कडक अंमलबजावणी

वरिल प्रमाणे नमूद सर्व कार्यवाहीचे पर्यवेक्षणाचे काम कार्यक्षेत्राप्रमाणे सबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था प्रमुख, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग, महसूल विभाग  यांची राहिल.  या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्‍हणून 7 ते 12 जुलै 2020 पर्यंत वरील पथकामार्फत कडक अंमलबजावणी करण्‍यात यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com