नांदेडात कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणाला सुरुवात, बाधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या आॅनलाईन शुभेच्छा 

शिवचरण वावळे
Saturday, 16 January 2021

शनिवारी (ता.१६) कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात देखील केंद्र शासनाच्या निर्देशाचे पालन करुन फ्रंटलाईन कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

नांदेड - देशभरात एकाच वेळी लाभार्थ्यांना शनिवारी (ता.१६) कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात देखील केंद्र शासनाच्या निर्देशाचे पालन करुन फ्रंटलाईन कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.
 
जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी बाराच्या दरम्यान सदाशिव मारोतीराम सुवर्णकार या पहिल्या लाभार्थ्यास लस देऊन शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आॅनलाईनद्वारे कोरोना वॉरियर्स यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा शुभारंभ झाल्याचे सांगितले. 

यावेळी आमदार अमर राजुरकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर मोहिणी येवणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते. 

हेही वाचा- Video - मातृतीर्थ माहूरच्या कुंडातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण सर्वोत्तम ​

संशोधनात महाराष्ट्र राज्य आग्रेसर 

आॅनलाईन शुभेच्छा देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचारी यांनी जिवाची बाजी लावून सर्व सामान्यांचा जिव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दरम्यान अनेकांना आपला जिव देखील गमावला आहे. परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी अतिशय कमी कालावधीत कोरोना प्रतिबंधात्मक लस शोधुन काढली आहे. त्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. विशेष म्हणजे या संशोधनात महाराष्ट्र राज्य आग्रेसर असल्याचा मनस्वी आनंद आहे. 

हेही वाचा- पोलिस कोठडी : खतगाव शिवारातील खुनाचे रहस्य उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून...!! ​

फ्रंटलाईन कर्मचारी यांना लसीचा पहिला डोस 

इतरांच्या आरोग्याची काळाजी घेणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस दिला जात असल्याने त्या सर्वांना श्री. चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. शनिवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक फ्रंटलाईन कर्मचारी यांना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. दरम्यान कॉग्रेसच्या वतीने आमदार अमर राजुरकर यांच्याहस्ते जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छा देऊन सत्कार करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona preventive vaccination begins in Nanded - Online greetings from Construction Minister Ashok Chavan Nanded News