रेशन दुकानदारांना कोरोना, धान्य घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांची पळापळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

दोन स्वस्त धान्य दुकानदारांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास एक हजार शिधापत्रिका धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच दुकानावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती.

नांदेड : जिल्ह्यात कोरोना विषाणूजन्य आजाराने चांगलेच हातपाय पसरले आहे. शहराच्या इतवारा भागात पुन्हा एकदा कोरोनाने जबर धक्का देत या भागातील नागरिकांची चांगलीच पळापळ सुरू झाली आहे. याचे कारण या भागातील दोन स्वस्त धान्य दुकानदारांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास एक हजार शिधापत्रिका धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच दुकानावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती.  शिधापत्रिका धारकांना पुढच्या महिन्यात करावयाच्या धान्य वाटपाचे वांदे झाले असून तुर्त तरी ही दोन्ही दुकाने बंद करण्यात आली आहेत.

शहरातील करबला आणि कुंभार टेकडी भागात एकानंतर एक अशी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच भागात राहणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्याला कोरोना संक्रमण झाल्याचे आढळून आले होते. तेंव्हापासून कुंभार टेकडी व करबला भागात दोन- तीनच्या संख्येत आणि कोरोना निघत आहेत. आता तर जवळच असलेल्या इतवारा भागातील दोन राशन दुकानदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

इतवारामधील शिधापत्रिकाधारक भयभीत

इतवारा भागातील एका गल्लीत अगदी जवळ जवळ तीन दुकाने आहेत. यापैकी दोन दुकान चालकांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी याच भागातील राशन दुकानावर बीएलओ म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यात दोन खूनाच्या घटनांनी खळबळ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

दोन्ही स्वस्त धान्य दुकानाचे शटर डाऊन

दुकानदारांना झालेल्या कोरोना संक्रमणाचे स्त्रोत येथेच असावेत अशी चर्चा या भागात सुरू झाली आहे. परंतु दुकानदारांना ही बाधा कशी घडली हे प्रशासकीय स्तरावरून अधिकृतपणे अद्याप तरी स्पष्ट करण्यात आलेले नाही. दुकानदारांना कोरोना संक्रमण झाल्याचे आढळून आल्यानंतर दोन्ही स्वस्त धान्य दुकानाचे शटर डाऊन करण्यात आले आहे. या दोन्ही दुकानांना जवळपास हजार शिधापत्रिकाधारक जोडलेल्या आहेत. गेल्या महिन्याचे धान्य वाटप या दुकानातून झाले आहे. येथून धान्य नेलेल्या शिधापत्रिका धारकांची यादी प्रशासनाकडे आहे. त्यांची तपासणी होणार किंवा तपासणीची गरज नाही हा निर्णय आरोग्य यंत्रणा घेणार असली तरी पुढील महिन्याचे धान्य वाटप त्यांना कुठून करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to ration shopkeepers, fleeing ration card holders nanded news