esakal | बुरुड व्यावसायिकांवर कोरोनाचे सावट; जगण्यासाठी करावा लागतोय संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

बुरुड समाजाची अवस्था (छायाचित्र- प्रमोदसिंह ठाकूर)

कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम जाणवत असून, बुरुड समाजही यातून सुटलेला नाही. मेहनतीने बांबूंपासून बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी दिवसभर उन्हात बसूनही ग्राहक मिळत नाही. जुना मोंढा येथे टोपले, सुप विक्रीसाठी घेऊन बसलेले श्रीकांत सोनवणे.

बुरुड व्यावसायिकांवर कोरोनाचे सावट;

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेडः कोरोना व वाढत्या महागाईमुळे सर्वच छोटे मोठे व्यावसायीक डबघाईला आले आहेत. त्यातून बुरुड समाजही सुटलेला नाही. बांबूपासून बनविलेले सुप, टोपल्या, फुलदाण्या, बास्केट बनवून त्यांच्या विक्रीवरच बुरड समाजाचा उदरनिर्वाह सुरु आहे. परंतु, सद्यस्थितीत हा व्यवसाय थंड झाल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत श्रीकांत माधवराव सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

श्री. सोनवणे म्हणाले की, १९९५ पासून जुना मोंढा भागात खरमुरे, फुटाणे, वटाणे विक्रीचा गाडा लावत होतो. त्यातून मिळणाऱ्या कमाईतून कसाबसा संसार चालायचा. पण शेंगदाणे, हरभरे यांचे भाव परवडत नसल्याने हा व्यवसाय बंद करून नाईलाजाने पारंपारिक (वडिलोपार्जित) व्यावसायाकडे वळावे लागले. सूप, दुरड्या, फुलदाण्या, झाल, बास्केट इत्यादी बांबूपासून बनविणारे साहित्यांची विक्री करतो. सर्वच वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. बांबूचे दरही न परवडणारे झाले. परंतु वडिलोपार्जित व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याचे श्री. सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा - उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे.

या कामात पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. तीच हे सर्व बनवून देते. मुलीसुद्धा हातभार लावतात. सध्या म्हणावं तसा ग्राहकांचा प्रतिसाद नाही. पण पोट भरण्यासाठी काहीतरी केल्याशिवाय मार्ग नाही. पूर्वी प्रत्येक घरात सूप, दुरडीशिवाय पर्याय नव्हता. पण आता स्टील, प्लास्टिकच्या वापरामुळे सूप, दुरडीची मागणी कमी होत आहे. लग्नात सूप, दूरडीचा वापर होतो. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे लग्नसराई सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे विक्री होणे अवघड झाले आहे.

संघर्षमय जीवन जगण्याची आली वेळ

परिवार खर्च, घरभाडे, लाईट बिल, मुलांचे शिक्षण हे कसे करायचे हा प्रश्न सध्या भेडसावत आहे. दारिद्र्य रेषेत असूनसुद्धा शासनाची कुठलीही मदत मिळाली नाही. चकरा मारुनच परेशान व्हावे लागते व काहीही उपयोग होत नाही. गेल्या लॉकडाऊनमध्ये २८ एप्रिल २०२० रोजी सकाळी सात वाजता वाहन न मिळाल्यामुळे घरुन पायी चालत जाऊन पत्नीच्या डिलिव्हरीसाठी दवाखान्यात दाखल झालो. ही आठवण आली तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही असे संघर्षमय जीवन जगण्याची वेळ आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

नाईलाजाने खरमुरे, फुटणे विक्री सोडून वडिलोपार्जित बुरुड समाजाच्या पारंपरिक व्यावसायाकडे वळलो. शासनाने स्टार्टअपच्या माध्यमातून आमच्या कलेला चालना देण्यासाठी पावले उचलावीत. ज्यामुळे आमचा पारंपरिक हा व्यवसाय डबघाईला येणार नाही.

- श्रीकांत माधवराव सोनवणे.

संपादन- प्रल्हाद कांबळे