सकारात्मक मानसिकतेसह रोग प्रतिकारशक्ती वाढवल्यास कोरोनाला हरवणे शक्य - डॉ. संदीप देशपांडे

file photo
file photo

नांदेड - आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये तणाव, मानसिक अस्थिरता हा अविभाज्य घटक आहे. वाढता आणि अनियंत्रित ताण आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर नकारात्मक परिणाम करून आपल्याला आणखी जास्त आजारी करू शकतो आणि आपण नवनव्या आजाराला बळी पडू शकतो, हे आता बऱ्याच शोधनिबंधातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या काळात प्रत्येकाने आपली मानसिकता सकारात्मक ठेवण्यासोबतच आपल्यातील रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे असल्याचा सल्ला नांदेडचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी दिला आहे. 

साधारण सव्वा वर्षापासून संपूर्ण मानवजात कोरोना विषाणू नामक एका अदृश्य शत्रूचा सामना करत आहे. या पूर्ण कालावधीमध्ये जगभरात करोडो लोक या विषाणूने बाधित झाले आणि लाखोंना आपले प्राण गमवावे लागले. आर्थिक, सामाजिक पातळीवर अतोनात नुकसान झाले. टाळेबंदी, एकलकोंडेपणा, सामाजिक दुरावा आणि पर्यायाने मानसिक तणाव वाढला. एकूणच या विषाणूने भयाणूचे रूप धारण केले व सद्य परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात नैराश्य पसरल्याचे दिसून येते. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाबतीत जास्त विचारमंथन चालू आहे ते म्हणजे सुदृढ मानसिकता आणि रोग प्रतिकारशक्ती... 

रोग प्रतिकारशक्ती म्हणजे थोडक्यात...
याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे म्हणाले की, रोग प्रतिकारशक्ती म्हणजे थोडक्यात शरीराने बाहेरून झालेल्या हल्ल्यावरचा दाखवलेला प्रतिसाद. तणाव तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नामक हॉर्मोन जास्तीच्या प्रमाणात द्रवीत करते. थोड्या आणि तात्पुरत्या तयार झालेल्या या हॉर्मोन मुळे प्रतिकारशक्तीला बळ मिळते आणि दाह कमी होतो, पण हे जेव्हा नित्याचे होते आणि रक्तामध्ये अधिकचे कॉर्टिसोल तयार होते. तेव्हा दाह वाढतो आणि रोगप्रतिकारशक्ती खालावते. या उपर अधिकचा आणि सततचा ताण शरीरातील पांढऱ्या पेशी, लिंफोसायट्सची (ज्या आजारामध्ये शरीराकडून लढत असतात) संख्या कमी करतो. शिवाय सततच्या आणि अधिकच्या ताणामुळे नैराश्य येऊन रोगप्रतिकारशक्ती खालावते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) आपल्याला दोन पातळीवर समजून घ्यावी लागेल. एक म्हणजे ज्यांना या विषाणूची बाधा होऊन उपचार चालू आहेत असे आणि दुसरी म्हणजे ज्यांना बाधा झाली नाही असे. त्यावर असलेल्या उपाययोजना अंमलात आणल्या तर निच्शितच त्यातून मार्ग निघू शकेल. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे करा 

  • तणाव आपल्या शरीरात नकळत प्रवेश करतो आणि नुकसान होते. म्हणून दिवसभर सकारात्मक रहा आणि नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. 
  • सोशल मिडियातील माहितीच्या भडीमारापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. 
  • कृतज्ञतेचा भाव बाळगून सराव करा. जेणेकरून तणाव कमी होईल. 
  • दररोज न चुकता ध्यान करा. 
  • मनाला आनंद देणाऱ्या सजग, जागृत गोष्टी करा. 
  • श्वसनाशी संबंधित व्यायाम, योगा करा.
  • चांगला चौफेर प्रोटीनयुक्त आहार घ्या. 

आनंदी राहण्याचा प्रयत्न करा - डॉ. संदीप देशपांडे 
‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण...’ या प्रमाणे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ज्या कोणामुळे तुम्हाला सकारात्मकता आणि आनंद मिळतो त्यांना पत्र लिहा, मेल करा अथवा टेक्स मेसेज करा, फोनवर बोला. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम, योगा करा. अगदी घरातल्या घरात, अंगणात सुद्धा शक्य असलेला व्यायाम (ब्रिक्स वॉक) करा. स्वतः आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चांगल्या सवयी साजऱ्या करा. 
- डॉ. संदीप देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ, नांदेड..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com