esakal | नांदेड जिल्ह्यात पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील शेतात पाणी साचून ऊस आडवा झाला.

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुखेडमध्ये नुकसानीचे प्रमाण अधीक आहे. जिल्ह्यातील ३८१ गावांना पूराची बाधा झाली आहे. जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर पुरामुळे लहान - मोठी ४० जनावरे दगावली आहेत. 

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - गेल्या दोन दिवसात अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१ गावांना फटका बसला. जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३८ हजार २४२ हेक्टरवरील खरिपासह बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचबरोबर जिल्ह्यात नऊ लहान व ३१ मोठी अशी एकूण ४० जनावरे दगावली आहेत. तसेच ६२१ कच्च्या घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली.
  
नांदेड शहर आणि जिल्ह्यात मागील रविवारपासून जोरदार पाऊस होता आहे. या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, ज्वारी या पिकांना दिलासा मिळाला. परंतु जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे यात खरीप पिकांसह बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा - Video - मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची अशोक चव्हाणांची ग्वाही

काही मंडळात अतिवृष्टीची नोंद
हा पाऊस नायगाव, उमरी, धर्माबाद, देगलूर, मुखेड व बिलोली या तालुक्यात अधिक होता. या तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे नदीकाठी तसेच सखल भागातील खरिपांच्या पिकांसह केळी, ऊस अशा बागायती पिकांचेही नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील ३८१ गावातील ३८ हजार २४२ हेक्टरवरील खरिपासह बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

एकाचा मृत्यू, ४० जनावरे दगावली
या सोबतच निजपूर (ता. किनवट) सुर्यकांत सुदाम डोइफोडे (वय ३५) यांचा मंगळवारी (ता. १५) वीज पडून मृत्यू झाला. तर नऊ लहान व ३१ मोठी अशी एकूण ४० जनावरे दगावली आहेत. तसेच ६२१ कच्च्या घरांची पडझड झाल्याची जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली.

हेही वाचलेच पाहिजे - इसापुर धरणाचे अकरा दरवाजे उघडले, धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा
 

मानार नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
ऊर्ध्व मानार धरण (लिंबोटी) ९७ टक्के एवढे गुरूवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजता भरले असून धरण पातळी ४४७.४५ मीटर आहे. ही धरणपातळी ४४७.६० मीटर आणि पाणीसाठा शंभर टक्के झाल्यावर धरणातील अतिरिक्त पाणी सांडव्यावरील गेटद्वारे मानार नदीत सोडण्यात येणार आहे. लिंबोटी धरणाच्या खालील भागातील मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. पात्रालगतचे शेती उपयोगी सामान, जनावरे इतरत्र हलवावीत व सतर्क राहावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाने केले आहे.

तालुकानिहाय पिकांचे झालेले नुकसान
(नुकसान व पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • तालुका..........पेरणी क्षेत्र...........बाधीत क्षेत्र........नुकसान (टक्के)
  • मुखेड...........७६,५२९.............१९,७६६..............५५
  • बिलोली.........४६,७२७.............११,४५०..............५६
  • देगलूर...........५८,८१३.............०३,१००...............४०
  • धर्माबाद.........३०,३६०.............०२,९०७...............४०
  • उमरी............३१,५१३..................८००...............४०
  • नायगाव.........४६,६३३..................२१९...............३५