एसटी महामंडळाचे लॉकडाउनमुळे झाले एवढे नुकसान...

file photo
file photo

नांदेड - कोरोनामुळे लॉकडाउन गेल्या ४५ दिवसापासून सुरु आहे. त्यामुळे त्याचा फटका अनेकांना बसला आहे. विशेष करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अग्रभागी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ते कोट्यावधींच्या घरात आहे. नांदेड विभागातील रोजचे ५० ते ७० लाखाचे नुकसान असून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना देखील त्याचा फटका वेतनाद्वारे सहन करावा लागत आहे. 

कोरोनामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाउन आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह अनेक कंपन्या, प्रतिष्ठाने बंद आहेत. गेल्या दीड महिन्यापासून भारतात देखील लॉकडाउन आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाउनचा फटका सर्वांनाच बसत आहे. महाराष्ट्रात देखील जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाची अशीच अवस्था झाली आहे. 

दीड महिन्यापासून एसटी बस जागेवरच 
गेल्या ४५ दिवसापासून जवळपास सर्वच आगारातील एसटी बस जागेवरच आहेत. अनेक बस धावल्या नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाला देखील कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत अग्रेसर असलेल्या रेल्वे आणि एसटी बसला लॉकडाउनमुळे जागेवरच थांबावे लागले. गेल्या दोन तीन दिवसांपासून परप्रातांतील मजूरांना सीमेपर्यंत सोडण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्यामुळे काही ठिकाणी आता बस धावू लागल्या आहेत. 

नांदेड विभागाचे दररोज लाखोंचे नुकसान
नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ आगार असून त्यात नांदेडसह माहूर, किनवट, हदगाव, भोकर, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार यांचा समावेश आहे. या नऊ आगारासाठी ५५० बस असून दररोज ५० ते ७० लाखाचे उत्पन्न होते. गेल्या दीड महिन्यात त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात उन्हाळी सुटी असल्यामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. मात्र, यंदा कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्व बंदच आहे. त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
 
नांदेड विभागात साडेतीन हजार मनुष्यबळ

एसटी महामंडळाचे नांदेड विभागात जवळपास साडेतीन हजार अधिकारी, कर्मचारी, कामगार, चालक आणि वाहक व इतर कर्मचारी आहेत. त्यामध्ये प्रत्येकी बाराशे चालक आणि वाहक आहेत. बससेवा बंद असल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. तसेच एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. गेल्या महिन्यापासून वेतनात कपात झाली आहे. त्याचबरोबर अजूनही मे महिन्याचा वेतनाचे काय होणार? किती कपात होणार? याची चिंता लागली आहे. त्यामुळे नागरिक, प्रवाशांसह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी देखील कोरोना कधी जाणार आणि लॉकडाउन कधी संपणार? याची वाट पाहत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com