महावितरणच्या सुसंवादातून ३२ कोटींची वीजबिले जमा- दत्तात्रय पडळकर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 30 September 2020

सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या संकल्पनेला वीजग्राहकांचा प्रतिसाद

नांदेड : कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता, विनंती व्हॉटसॲप व प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळाने ३२ कोटी २६ लाख रूपयांच्या विज देयकांची वसूली केली आहे. मराठवाडा विभागातून सर्वाधिक वसुली करण्यात नांदेड परिमंडळाने यश प्राप्त केले आहे.

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या संकल्पनेतून सुसंवादाची ही मोहीम राबविली जात आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडुन कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत नाही. वीज ग्राहकांनी वीजबिले भरण्यासाठी स्वत:हुन पुढे यावे यासाठी विनंती, सुचना, पत्रव्यवहार, व्हॉटसॲप, एसएमएस व प्रत्यक्ष भेट घेवून सुसंवाद साधण्याच्या सुचना डॉ. नरेश गिते यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर थकबाकी वसुली करणे सोपे जावे यासाठी रेड, यलो आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी करुन टॉप १०० ग्राहकांची यादी तयार करुन देण्यात आली होती. 

हेही वाचा -  दुर्दैवी घटना : सख्ख्या दोन चुलत भावांचा डोहात बुडून मृत्यू -

वीज ग्राहकांनीही सकारात्मकतेने या मोहिमेस उत्तम प्रतिसाद

त्यानुसार नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी परिमंडळातील सर्व विभाग प्रमुख तसेच उपविभागीय अधिकारी, कर्मचारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरर्सिंगच्या माध्यमातुन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या सर्व निर्देशांचे पालन करत विजग्राहकांना कसल्याही प्रकारचा त्रास न देता सुसंवाद साधत थकबाकी वसुलीचे उध्दिष्ट साध्य् करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वीज ग्राहकांनीही सकारात्मकतेने या मोहिमेस उत्तम प्रतिसाद देत वीज देयकांचा भरणा केला आहे.

हे आहेत झोननिहाय आकडे

ग्रीन झोनमध्ये असलेल्या नांदेड परिमंडळातील वीज ग्राहकांनी ता. २४ सप्टेबर अखेर पाच कोटी ११ लाखांचा भरणा केला आहे. यलो झोन मधील १३ उपविभागातील वीजग्राहकांनी १४ कोटी ७८ लाखांचा भरणा केला आहे. त्याच बरोबर रेड झोन मधील १० उपविभागातील वीज ग्राहकांनी १२ कोटी ३७ लाखांचा वीज बील भरणा केला आहे.

येथे क्लिक करा - नांदेड : परतीच्या पावसामुळे रानमेवा असलेले सिताफळ बेचव -

वीजबील भरण्यात सातत्य ठेवावे

कोवीड-19 चा प्रादूर्भाव वाढू नये याकरिता लॉकडाऊनच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम साठी महावितरणने अखंडीत वीज सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर वीजदेयक भरण्यासाठी वीजग्राहकांवर कसल्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही.अखंडीत वीजसेवा देण्यासाठी महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वीजग्राहकांनी थकबाकी व चालू देयक भरण्यासाठी पुढे आले पाहिजे. एकरकमी व निहीत वेळेत वीजबिल भरल्यास नियमाप्रमाणे वीजबिलात सुट देण्यात येत आहे. तसेच वीजबील भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुसंवाद मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळत असून यापुढेही वीजबील भरण्यात सातत्य ठेवावे.

दत्तात्रय पडळकर. मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ    

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dattatraya Padalkar collects electricity bills of Rs 32 crore from MSEDCL nanded news