कर्जमाफीच्या फंड्याने शेतकऱ्यांची पत झाली खराब  

प्रमोद चौधरी
Saturday, 26 September 2020

ज्यांना अजूनही कोणत्याच कर्जमाफीचा लाभ भेटला नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

नांदेड : गेल्या दोन ते तीन दशकांपासून राजकीय फंड्यातून कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखविले गेल्याने अनेकांनी ऐपत असूनही कर्जमाफीचा लाभ मिळेल याच एकमेव आशेवर कर्ज भरलेले नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे थकीत झालेले कर्ज आता अव्वाच्या सव्वा झाल्याने व शेतमालाला खर्चाच्या मानाने भाव मिळत नसल्याने थकीत रक्कम भरण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची नसल्याने अनेक शेतकऱ्यांची पत खराब झाली आहे.

गेल्या दोन दशकापासून वेगवेगळ्या सरकारने अटी, शर्थी व निकषांच्या आधारावर कर्जमाफी केली. यात काही शेतकऱ्यांना फायदा झाला असेलही; परंतु अजुनही असे काही शेतकरी आहेत की, त्यांना ही कर्जमाफी मिळूच शकली नाही. का मिळाली नाही? याचे नेमके कारणही त्यांना समजू शकलेले नाही.  

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात अखेर उपस्थिती भत्ता आणि पोषण आहाराचे वाटप

कर्जमाफीची आकडेवारी पाहिली तर अजूनही अनेक जुने शेतकरी थकीत कर्जदार आहेत. त्यांच्या सातबाऱ्यावरचा कर्जाचा बोजा कायम असल्याने त्यांना कोणत्याच बॅंका उभ्या करत नसल्याने त्यांची पतच खराब झाली आहे. पर्यायाने वेळेवर शेतीला पैसे सापडत नसल्याने ते पुन्हा अधिकच्या उत्पन्नापासून परावृत्त होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असताना काही शेतकरी कर्जमाफीचा लाभ भेटून आजही ते बॅंकांच्या पायऱ्या चढत आहेत. एकप्रकारे काही शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. ज्यांना अजूनही कोणत्याच कर्जमाफीचा लाभ भेटला नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हे देखील वाचलेच पाहिजे - खासदार हेमंत पाटील यांनी घेतली केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री यांची भेट, काय आहे प्रकरण

कर्जमाफीत शेतीसंबंधी सर्व कर्ज माफ असावे
गेल्या काही वर्षांपासून शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यात फक्त पिककर्जाचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक शेतीसंबंधी जसे विहीर, पाईपलाईन, ठिबकसिंचन, शेतीयंत्रे, औजारे साठीचे कर्जही शासनाने माफ केली पाहिजेत. 
- रावसाहेब घुगे पाटील (शेतकरी)

मी २००७ मध्ये पीककर्ज व शेतीसंबंधी कर्ज घेतले व दुसऱ्याच वर्षी कर्जमाफी झाली. परंतु त्यावर्षी मी नियमित कर्जदार असल्याने कर्जमाफीत बसलो नाही. नंतर आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या कर्जमाफीत सालाचे निकष लागू झाल्याने ते कर्ज माफ झालेच नाही. तेच कर्ज आज चार पटीत वाढले आहे.  तेव्हापासून कोणत्याच बॅंकेने कर्ज न दिल्याने आर्थिक परिस्थिती अभावी उत्पन्नात घट झाली आहे.
- वामनराव उघडे (शेतकरी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt Waiver Increases The Hardship Of Many Farmers Nanded News