आमदारांकडून रस्ते कामासाठी अधिकाऱ्यांची कानउघडणी

गजानन पाटील
Tuesday, 23 June 2020

 राष्ट्रीय महामार्गाची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित असून परिणामी मोठमोठे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असतानाही या महामार्गाची प्रलंबीत कामे सुरू होत असताना दिसत नाहीत. त्यामुळे महामार्गाची कामे तत्काळ सुरू करण्यासंदर्भात सूचना देऊन त्यांची कानउघाडणीही आमदार जवळगावकर यांनी केली आहे.

हदगाव, (जि. नांदेड) ः राष्ट्रीय महामार्गाची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित असून परिणामी मोठमोठे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असतानाही या महामार्गाची प्रलंबीत कामे सुरू होत असताना दिसत नाहीत. त्यामुळे महामार्गाची कामे तत्काळ सुरू करण्यासंदर्भात सूचना देऊन त्यांची कानउघाडणीही आमदार जवळगावकर यांनी केली आहे.

महामार्गाची कामे अर्धवट

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाची कामे अर्धवट झाली असून मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात याले आहे. नागरिकांना जाण्यासाठी कुठली एक बाजू त्यांच्याकडून पूर्ण करण्यात आली नाही. दोन्ही बाजू अर्धवट करून ते काम पूर्णतः अनेक दिवसांपासून बंद केल्या गेले. ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे त्या ठिकाणी मुरूम अंथरल्या गेला आहे. त्यावर पाणीही टाकल्या जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ रस्त्यावर उडत असल्याने अपघातांत वाढ होत होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापकांना खडेबोल सुनावत हिमायतनगर-हदगाव-तामसा येथील अर्धवट असलेली कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा -  शाळा सुरू करण्याची घोषणा पोकळ असल्याची प्रा. सुनील नेरलकर यांची टीका -

हदगाव येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील सर्व कार्यालयांचे कार्यालयीन प्रमुख यांची बैठक घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आमदार जवळगावकर यांनी चर्चा केली आहे. त्यात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन बॅगा उगवल्या नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे सदरील कंपनीची चौकशी करून शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करत शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना आमदार जवळगावकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच चोरंबा- निमगाव- सावरगाव रस्त्याच्या अनुषंगाने वनविभागाची असलेली जमीन संपादित करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी श्री. डी. एस. पवार, येथील वन परिक्षेत्र अधिकारी शरयु रुद्रवार तसेच कार्यकारी अभियंता राजपूत त्यांना बोलावून जमीन संपादित करण्यासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही आमदार जवळगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या वेळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील सोनुले, जिल्हा परिषद सदस्य के. सी. सूर्यवंशी, संदीप काळबांडे, जवळगावकर यांचे स्वीय सहायक अजय सूर्यवंशी यांची यावेळी उपस्थिती होती.

ग्रामीण भागासह तालुक्यातील नागरिक आपापल्या वेगवेगळ्या कामासंदर्भात कार्यालयात जात असतात. काही कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे किंवा त्यांच्या अप-डाऊनमुळे किंवा काम न करण्याच्या उदासीनतेमुळे नागरिकांची कामे खोळंबली जातात. त्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे. त्यामुळे यानंतर जनतेची कामे प्रलंबित न ठेवता तत्काळ मार्गी लावावे.
- माधव पाटील जवळगावकर, आमदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Completion Of Road Works, Nanded News