तहसिलदारालाच मागितली खंडणी : एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 22 August 2020

त्यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना शनिवारी (ता. २२) न्यायालयसमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड : एका राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही पत्रकारांनी चक्क माहूर तहसिलदार यांनाच खंडणी मागितली. मात्र खंडणी स्विकारताच पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ता. २० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परसिरातून अटक केली. त्यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना शनिवारी (ता. २२) न्यायालयसमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

माहूरचे तहसिलदार सिद्धेश्‍वर सुरेश वरणगावकर (वय ५४) हे आपले नियमीत शासकिय काम करत असत. मात्र त्यांच्याविरुद्ध या भागातील एका राजकिय पक्षाचे पदाधिकारी आणि काही पत्रकार हे अर्जफाटे करत. त्यांच्या विरोधात बदनामीकारक व खोट्या बातम्या आपआपल्या वर्तमान पत्रातून प्रकाशीत करत. यामुळे तहसिलदार यांची नाहक खात्यात बदनामी होत असे. शेवटी अशा प्रकारच्या बातम्या बंद करायच्या असतील तर दीड लाखाची त्यांना खंडणी मागितली. नाही हो करत तहसिलदार यांनी ५० हजार रुपये दिले. 

हेही वाचा Video - संगीत शब्द ऐकल्याने मन का होते उल्हासित, वाचाच तुम्ही

एक लाखाची खंडणी स्विकारल्यानतंर पोलिसांच्या जाळ्यात

५० हजाराची लालच मिळाल्याने पुन्हा एक लाखासाठी उपोषणाचे हत्यार उपसले. ता. १५ आॅगस्ट रोजी तालुक्यातील अवैध वाळू उपसा आपल्या आशीर्वादाने होतो. असे म्हणून उपोषणाचा इशारा दिला. मात्र संयमी तहसिलदार वरणगावकर यांनी एक लाख रुपये देण्याचे कबुल केले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. ठरलेले एक लाख रुपये नांदेडमध्ये देण्याचे ठरले. यामुळे हे पैसे घेण्यासाठी माहूर किनवटहून एका पक्षाचे पदाधिकारी आणि काही पत्रकार नांदेडात दोन दिवस तळ ठोकून होते. मात्र ही रक्कम देण्याची इच्छा नसलेल्या तहसिलदार यांनी पोलिसांशी संपर्क साधला. 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यानंतर पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि स्थानिक गुन्‍हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांनी गुरुवारी (ता. २०) दुपारी पाचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा लावला. ठरल्याप्रमाणे खंडणीची रक्कम घेण्यासाठी ही मंडळी तिथे आली. यावेळी तहसिलदार श्री. वरणगावकर यांनी त्यांना एक लाख रुपये दिले. यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी एक लाख रुपये जप्त केले. त्यांना वजिराबाद पोलिस ठाण्यात हजर केले. 

येथे क्लिक करानांदेडात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस : लगातार दोन दिवसात तीन लुटमारीच्या घटना

पाच आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी

तहसिलदार सिद्धेश्‍वर वरणगावकर यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २२) पहाटे एकच्या सुमारास संगणमताने खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय सुनिल नाईक यांनी आरोपी नितीन गणेश मोहरे रा. किनवट, गजानन प्रकाश कुलकर्णी रा. माहूर, दुर्गादास राठोड रा. किनवट, अंकुश भालेराव, राजकुमार नारायण स्वामी रा. नांदेड यांना प्रथमवर्ग न्यायाधीश (पाचवे) यांच्या न्यायालयासमोर हजर केले. यातील आरोपी श्री. कामारीकर हा पोलिसांच्या अटकेत नाही. वरील पाच जणांना न्यायालयाने ता. २५ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. यामुळे एका राजकिय पक्षात व पत्रकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demanded from Tehsildar: Police custody of journalists along with office bearers of one party nanded news