esakal | पंडित नाथराव नेरलकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्र पोरके झाले
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

 संगीत क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व पंडित नाथराव नेरलकर (वय 86) यांचे रविवारी (ता.28 मार्च 2021) औरंगाबाद येथे निधन झाले.

पंडित नाथराव नेरलकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्र पोरके झाले

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः  संगीत क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व पंडित नाथराव नेरलकर (वय 86) यांचे रविवारी (ता.28 मार्च 2021) औरंगाबाद येथे निधन झाले. नांदेडमध्ये गानमहर्षी डाॅ. आण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी बालपणापासून गायनाचे धडे गिरवले. 

१९५८ ला त्यांनी "अनंत संगीत महाविद्यालय" ची स्थापना केली. त्या माध्यमांतून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे संगीत अध्यापनाचे काम चालू होते. मराठवाडा परिसरात विविध संगीत महोत्सवांच्या माध्यमांतून शास्त्रीय संगीत प्रसाराचे त्यांचे कार्य अतुलनीय आहे. 

हेही वाचा - ग्रामीण भागात तर ऑनलाइन शिक्षण अधिक खडतर झाले असून विद्यार्थी तर विद्यार्थीसोबत पालक सुद्धा मेटाकुटीला येत आहेत

डी. पी. सावंत (माजी मंत्री, नांदेड) ः मराठवाड्यातील एकमेव प्रतिभावंत कलाकार म्हणून पंडित नाथराव नेरळकर यांची ओळख होती. अतिशय प्रेमळ आणि सर्वांना सोबत घेवून चालणारे पंडित नाथराव नेरळकर होते. शंकर साहित्य दरबारला त्यांचे मार्गदर्शन, त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा होता. ऋणानुबंध होते. विशेष म्हणजे नांदेडच्या शारदा भवन एज्युकेशन सोसायटीमध्येही त्यांचे काॅन्ट्रीब्युशन महत्त्वाचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील प्रतिभावंत कलाकार हरपल्याचे दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 

रत्नाकर आपस्तंभ (ज्येष्ठ शिष्य, नांदेड) ः  पंडित नाथराव नेरळकर जरी औरंगाबाद रहात असलेतरी, त्यांची नाळ ही नांदेडशीच होती. अण्णासाहेब गुंजकर यांच्यानंतर रमेश कानोले, पंडित नाथराव नेरळकर यांनी संगीताचा प्रचार, प्रसार केला. मी स्वतः त्यांच्या घरी 10 वर्ष राहून गुरुकुल पद्धतीने संगीताचे धडे गिरवले आहेत. तेव्हा पंडित नाथराव हे होळीवरील प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेत शिकवत होते. साधारण 1972 मध्ये ते नोकरी सोडून औरंगाबादला स्थायिक झाले. तेथेही मी त्यांच्याकडे पाच वर्ष राहून संगीताचे शिक्षण घेतले. मराठवाड्यातील सांगितिक, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता. विशेष म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंत औरंगाबादला आल्यावर सर्वप्रथम त्यांची भेट घेतल्याशिवाय रहात नव्हते. असे हे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याची फार मोठी हानी झाली आहे.
 
संजय जोशी (ज्येष्ठ शिष्य, नांदेड) ः माझे गुरु पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाने मराठवाड्यातील संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांचे अचानक जाणे हे धक्कादायकतर आहेच पण सर्व कलावंतांसाठी आधारवड कोसळल्यासारखे आहे. मराठवाड्यातील संगीताचा प्रचार आणि प्रसार अण्णासाहेब गुंजकर यांच्या नंतर पंडित नाथराव नेरळकर यांनी निष्ठेने केला होता. सर्व कलावंतांच्या ठायी पालक असल्याची भावना ते सतत ठेवून सर्वांना मार्गदर्शन, मदत करत असत. मी स्वतः त्यांच्याकडे शिकलो, वाढलो ही केवळ त्यांची माझ्यावर कृपादृष्टी होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

हे देखील वाचा - वन्यजीवांच्या संख्येत घट होण्याचा दर रस्ते अपघातामुळे सर्वाधिक आहे

प्रा. सुनील नेरकर (नांदेड) ः  पंडित नाथराव नेरळकर म्हणजेच संगीताचा सतत झुळ झुळ वाहणारा झरा. त्यांच्या दुःखद निधनाने तो झरा पुर्णतः आटला आहे. 1970 ते 72 मध्ये मी त्यांचा विद्यार्थी होतो. महाराष्ट्र आणि देशभरातील दिगग्ज कालाववंताशी त्यांचा फार जवळचा संबंध होता. गुरुजींनी नुसतेच गाणसेन नाही तर कानसेन संपूर्ण मराठवाड्यात तयार केले. स्वतःचा छंदच व्यवसाय व्हावा असे फार कमी लोकांच्या नशिबी असते. पण गुरुजी नशीबवान होते त्यांचं संपूर्ण आयुष्य संगीताने व्यापून गेले होते. गुरुजींना आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले परंतु दोन वर्षांपूर्वी संगीत नाटक कला अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते मिळाला याचा आनंद आमच्या सारख्या शिष्यांसहित संपूर्ण मराठवाडय़ातील संगीत प्रेमींना झाला. पोरके होणे हा शब्द जरी गुळगुळीत झाला असला तरी खरेच नाथरावांच्या निधनाने मराठवाड्यात संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

डाॅ. जगदीश देशमुख (ज्येष्ठ तबलावादक, नांदेड) ः पंडित नाथराव नेरळकर हे संगीताचे चालते बोलते विद्यापीठ होते. एखादी मैफील मग ती गाण्यांची असो की गप्पांची, तिला रंगवण्याची हातोटी फक्त नाथराव गुरुजींकडे होती. नाथराव गुरुजी संगीतासाठी कायम एका पायावर नटराजासारखे तयार असायचे. प्रत्येक कलावंतांचा मग तो लहान असो की मोठा त्यांचा मानसन्मान करण्याचे, त्यांच्या इच्छेनुसार तीथपर्यंत पोचवण्याची क्षमता फक्त पंडित नाथराव नेरळकर यांच्यामध्ये होती. त्यामुळे नवीन कलावंतांना आश्वासक आणि ठाम असे ठिकाण नाथराव होते. अनेक मैफलींना मी स्वतः त्यांना तबल्याची साथ केलेली आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

डाॅ. जगदीश कदम (ज्येष्ठ साहित्यिक) ः  मराठवाड्याच्या शास्रीय संगीत क्षेत्रातील एक अधिकारी आणि ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व म्हणून पंडित नाथराव नेरलकर परिचित होते. विख्यात शास्त्रीय गायक पंडित अण्णासाहेब गुंजकर यांची संगीत परंपरा त्यांनी पुढे नेली. शास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि सर्व स्तरातील श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी  परिश्रम घेतले. छोट्या मोठ्या गावात आयोजित केलेल्या शास्रीय संगीताच्या मैफलीत सहभागी झाले. देश आणि परदेशात सुध्दा त्यांचा फार मोठा चाहता वर्ग असून त्यांचा शिष्य वर्गही सर्वदूर पसरलेला आहे. नांदेड येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत शंकर दरबारात त्यांची आवर्जून हजेरी असायची. त्यांच्यामुळे जागतिक कीर्तीचे अनेक गायक, वादक मराठवाड्यातील संगीत महोत्सवात सहभागी झाले. पंडित नाथराव नेरलकर यांच्या निधनाने मराठवाड्याचे संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व हरवल्याचे दुःख होत आहे.
  
अनुराधा श्यामसुंदर नांदेडकर (अध्यक्ष, संगीत साधना प्रतिष्ठान, हिंगोली) ः सर्वांचे लाडके, अनेक शासकीय पुरस्काराने सन्मानीत, अनेक शिष्य घडविणारे नाथराव नेरळकर माझ्यापेक्षा वयाने वडीलधारे, त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्र अनाथ झाले. त्यांची महाराष्ट्रातच नाही तर भारतात ख्याती होती. मागील आठवड्यात मला फोन करुन ख्याली खुशाली त्यांनी विचारली होती. नाथरावांनी मराठवाडा संगीत संमेलन औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद येथे मला शास्त्रीय मैफीलीचा कार्यक्रम करण्याची संधी दिली. सर्वांना अतिशय प्रेमाने मार्गदर्शन ते करायचे व सर्व कलाकारांची काळजी करणारे नाथराव. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला याप्रमाणे संगीत क्षेत्रातील लोकांना व परिवाराला पोरके करून गेले. त्यामुळे आम्ही पोरके झालो. 

डाॅ. कमलाकर परळीकर (सुरमणी, परभणी) ः  आत्ताच आमचे मित्र पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाची बातमी कळाली. ऐकून मन सुन्न झाले. माझा आणि त्यांचा गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षापासून स्नेहसंबंध. आमच्या दोघांपुरताच मर्यादित नसून आमचे कौटुंबिक संबंध होते. आम्ही दोघेही गायक कलावंत. मराठवाड्यातील त्यांचे काम नि:संशय प्रेरणादायी आहे. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत संगीतातच ते रममाण राहिले. क्रियात्मक संगीत, संगीत शास्त्र यांच्या जोडीला अनेक संगीत संमलने आयोजित करून मराठवाड्याला त्यांनी सांगीतिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याची सांगीतिक चळवळ व सांस्कृतिक चळवळ ही अर्धवट राहिली. संगीतातील उत्तम गुरु, उत्तम कलावंत, उत्तम संयोजक, उत्तम रसिक यांचा जीवन प्रवास आज थांबल्याचे दुःख झाले. 

loading image
go to top