स्कुलबस मालक व चालकांवर नैराश्याचे सावट   

प्रमोद चौधरी
Friday, 11 September 2020

मार्च महिन्यापासून शाळाच बंद असल्यामुळे स्कुलबसची चाकेही थांबलेलीच आहेत. परिणामी स्कुलबस मालक व चालकांना रोजच पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परिणामी त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.

नांदेड :  शाळा-महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कुलबस चालक-मालक अडचणीत आले आहेत. कर्ज घेत स्कुलबस खरेदी केलेल्या बसमालकांनी उत्पन्न होत नसल्याने गाड्या दारासमोर उभ्या केल्या आहेत. कर्जाची परतफेड करायची कशी? या विवंचनेत मालकवर्ग तर चालक देखील वेतन नसल्याने अडचणीत आला आहे.   

कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कुल बसेस सज्ज असतांना शाळा बंदमुळे त्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शहरात आज हजाराच्या वर स्कुलबसेसची संख्या आहे. बहुतेक शाळांकडे स्वत:च्या स्कुलबसेस आहेत. त्यांनी चालकांना वेतनावर नेमलेले आहे. दुसरीकडे अनेकांनी स्वत:ची बस खरेदी करुन शाळांवर लावली आहे. काही मालक स्वत: तर काहींनी चालक ठेवलेले आहेत. मात्र, सध्या शाळा बंद असल्याने या स्कुल बसेसची चाके अद्याप रुतलेलीच आहेत. यामुळे स्कुलबस मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

हेही वाचा - नांदेडला रुग्णांचा आकडा दहा हजार पार, ६५ टक्के बाधित रुग्ण बरे; गुरुवारी ३२७ पॉझिटिव्ह

शासन-प्रशासनाने या वर्गाकडेही लक्ष देण्याची विनंती संबंधित व्यावसायिकांनी केली आहे. अनेकांनी उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून स्कुलबस व्यवसायाची निवड केली. यासाठी बँकांकडून मोठे कर्ज घेतले, आतापर्यंत सर्व ठिक होते. हप्ते वेळेवर भरले. परंतु कोरोनामुळे शाळा उघडण्यास परवानगी नसल्याने स्कुल बसेसदेखील बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी उत्पन्न होत नसल्याने हप्ते थकले आहेत. बँकांची कर्जफेड कशी करावी तसेच कुटुंब कसे चालावावे असे मोठे प्रश्न स्कुलबस मालकांपुढे उभे ठाकले आहेत. 

हे देखील वाचाच - परभणीत एकाचा मृत्यू, १४० पॉझिटिव्ह

चालक पर्यायी नोकरीच्या शोधात
स्कुल बस मालकांप्रमाणेच चालकदेखील अडचणीत आले आहेत. मालकाकडून वेतन बंद झाल्याने तसेच टुरीझम बंद असल्याने इतर कुठेही त्यांना काम मिळेनासे झाले आहे. घर चालविणे गरजेचे असल्याने चालकवर्ग पर्यायी नोकरीच्या शोधात पायपीट करत असल्याचे चित्र आहे. नोकरी मिळत नसल्याने तसेच शिक्षण कमी असल्याने काही चालकांनी भाजीपाला व्यवसाय तर काहींनी मातीकामदेखील स्वीकारले आहे तर काही जण गावी गेले. 

संसाराचा गाडा कसा चालवावा
कोरोनामुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर गडांतर आले आहे. शाळा बंद असल्याने आमच्याही नोकरीवर गदा आली असून, मार्च महिन्यापासून पगार नसल्याने आम्हा चालकांवर घर चालविण्यासाठी यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. 
- सुखदेव सोनवणे (स्कूल बसचालक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Depression On School Bus Owners And Drivers Nanded News