esakal | कार्यारंभ आदेशाविना विकास कामांचा सपाटा; 'तामसा पॅटर्न'ची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

तामसा परिसरात निकृष्ट कामे

कार्यारंभ आदेशाविना विकास कामांचा सपाटा; 'तामसा पॅटर्न'ची चर्चा

sakal_logo
By
शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : टेंडर प्रक्रियेच्या कचाट्यात अडकल्याने कार्यारंभ आदेश निघाले नसतानाही तामसा शहरात विकास कामे उरकण्याचा सपाटा चालू झाला असून या 'तामसा पॅटर्न' ची चर्चा जोरात चालू आहे. महिन्यापासून शहराच्या विविध भागात रस्त्याची विकास कामे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत भूमिपूजन करीत थाटामाटात होत असलेले फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे एकाही भूमिपूजनस्थळी शासनाचे कर्मचारी किंवा अभियंते हजर नाहीत. त्यामुळे या विकास कामाच्या वैधतेची चर्चा व कुजबुज चालू आहे.

ज्या भागात सिमेंट रस्ते होत आहेत त्या भागात रस्त्याची आवश्यकता किती ? यावरही नागरिकांमध्ये मंथन होत आहे. सिमेंट रस्त्याच्या कामाचा वेग आश्चर्यकारक असून आठवड्यात सिमेंट रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. पण प्राप्त माहितीनुसार महिन्यात शहरात झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामांना मंजुरी असली तरी टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कार्यारंभ आदेश शासनाच्या संबंधित विभागाकडून अद्यापही निघाले नाहीत. त्यामुळे सिमेंट रस्त्याच्या वैधतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यारंभ आदेशाशिवाय संबंधित अभियंत्यांच्या नियंत्रण व सूचना शिवाय सिमेंट रस्त्याची कामे उरकण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. उरकलेल्या सिमेंट रस्त्याचा निधी, ठिकाण, लांबी, रुंदी, काम करणारी एजन्सी याबद्दलचे अधिकृत इस्टिमेट कार्यारंभ आदेश नसल्याने झाले नाही. तरीही काम पूर्ण होण्यामागचे 'धाडस' चर्चेत आहे. या "तामसा पॅटर्न" ला शहरातील दोन वर्षांपूर्वी झालेल्या पेवर ब्लॉक कामाची पार्श्वभूमी अनुभव म्हणून बोलली जाते. आधी विकास काम उरकून घ्यायचे व नंतर कार्यारंभ आदेश, टेंडरिंगचा सोपस्कार उरकण्याची पद्धत येथे बघायला मिळत आहे.

हेही वाचा - नांदेडात 700 वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड; 400 वृक्षांना ट्री गार्ड

चुकीच्या व वादातील विकास कामाला नंतर संबंधित अभियंते देखील मूकसंमती देत निधी उपलब्धता व मान्यतेच्या प्रक्रिया करतात. यासाठी संबंधित अभियंत्यांना विना कष्टाचा टक्केवारी रुपी मलिदा मिळतो. पण या सिमेंट रस्त्यांच्या दर्जाबद्दल फारशा अपेक्षा नसतात. कार्यारंभ आदेश याशिवाय शहरात झालेल्या सिमेंट रस्त्याबद्दल एका अभियंत्याने देखील आश्चर्य व्यक्त केले असून भूमिपूजनासाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले. नुकताच झालेला सिमेंटरस्ता पावसाचे पाणी तुंबल्याने अडचणीचा ठरण्याच्या कारणावरुन फोडण्यात आला आहे.

यामुळे रस्त्याद्वारे जनतेची सोय किती व संबंधित लोकप्रतिनिधी, कंत्राटदार यांचा फायदा किती ? यावर शहरात जोरदार चर्चा होत आहे. आधी विकास काम व नंतर टेंडरिंग प्रक्रीया कार्यारंभ आदेश होण्याचा तामसा पॅटर्नची चर्चित असून झालेल्या सिमेंट रस्त्याला पुन्हा प्रक्रियेत बसवून निधी उचलला जातो का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या शासकीय नसलेला पण लवकरच होणाऱ्या हा सिमेंट रस्ता "कुरण" म्हणून फायद्याचा ठरणार का ? याकडे उत्सुकतेने लक्ष लागलेआहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image