नांदेडमधील युवा कलाकारांनी सादर केले भावभक्ती गीतं 

प्रमोद चौधरी
Wednesday, 3 February 2021

भारती पांपटवार यांच्या स्मृती जागविण्यासाठी आयोजित स्वर सुमनांजली कार्यक्रमात स्वरुप देशपांडे, शबरी हिरवे, चैती दीक्षित आणि रश्मी चौधरी यांनी गायन केले.

नांदेड ः गोड आवाजाची, अखेरच्या खडतर जीवन प्रवासात संगीत हाच ध्यास व श्वास असणारी तसेच आयुष्यात सतत सामाजिक भान जपणारी भारती पांपटवार हिच्या स्मृती दिनानिमित्त सुगम गीतांचा कार्यक्रम ‘स्वर सुमनांजली’ रविवारी (ता. ३१) झाला.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गायक संजय जोशी, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अर्चना देशपांडे व निवेदक गोविंद पुराणिक होते. सुरवातीला स्मृती प्रतिष्ठानचे संयोजक अनिल पांपटवार यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचादमरेच्या नांदेड विभागातूुन जानेवारी महिन्यात 33 किसान रेल्वे धावल्या; 6.58 कोटीचे महसुल

त्यानंतर सरस्वती रागातील सुंदर बंदिशीने ‘स्वर सुमनांजली’ला सुरुवात झाली. स्वरूप देशपांडे यांनी गायलेले भावपूर्ण ‘तू सप्तसूर माझे’, ‘डोळ्यावरून माझ्या’ ही गाणी तर शबरी हिरवे हिने सादर केलेले ‘खेड्यामधले घर कौलारू’ व ‘गा गीत तू सतारी’ तसेच चैती दीक्षित यांनी सादर केलेले ‘घन राणी’ व ‘ऋतू हिरवा’ आणि रश्मी चौधरी यांच्या ‘ही वाट दूर जाते’ आदी गीतांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. त्यांना पंकज शिरभाते (व्हायोलीन), स्वरेश देशपांडे (तबला), स्वप्नील श्रीमंगले (साईड ह्रिदम) व स्वरूप देशपांडे (संवादिनी) यांनी साथ दिली.

निवेदन पूजा शिराढोणकर- देशपांडे यांचे होते. डॉ. प्रमोद देशपांडे यांच्या संकल्पनेतून ही संगीत मैफल झाली. यशस्वीतेसाठी संयोजक अलका व अनिल पांपटवार, लक्ष्मीकांत फुके, गंगासागरे, स्मीता व उमेश मामीडवार, सारिका व हरीश चक्रवार, राजीव देशपांडे, पवन तिवारी, श्रीराम उर्फ मिहीर जोशी, शुभम कांबळे आदींनी पुढाकार घेतला. ध्वनी तंत्रज्ञान व्यवस्था भार्गव देशमुख यांनी सांभाळली. जयंत वाकोडकर यांनी सुत्रसंचालन केले. छाया पटुले व पद्मा बाशेट्टी यांनी काढलेल्या रांगोळ्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotional songs performed by young artists from Nanded