बदलिधारक शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर, काय आहे कारण? ते वाचाच

प्रमोद चौधरी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पदाधिकारी व अधिकारी यांच्यात बिनसल्याने नांदेड जिल्याह्यातील शिक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बदलिधारक शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

नांदेड, ता. २ ः या वर्षीच्या बदल्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासननिर्णयाप्रमाणे व वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले परिपत्रके विचारात घेऊन ऑफलाईन, समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्याबाबत राज्यशासनाच्या वतीने सर्व जिल्हा परिषदेला १५ जुलै रोजी आदेश देण्यात आले होते. परंतु पदाधिकारी व अधिकारी यांच्यात बिनसल्याने या बदल्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बदलिधारक शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती व सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांची बैठक घेतली. त्यामध्ये सर्वांची मते विचारात घेऊन कोरोनाच्या बाबतीत शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून टप्याटप्याने शिक्षकांना बोलावून कोणावरही अन्याय होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्याचे ठरले. तसेच ही प्रक्रिया पारदर्शकपणे समुपदेशनाने स्क्रीनवर सर्व रिक्त गावे दाखवून बदल्या करण्याचा ठरावही घेतला.

हेही वाचा - बापरे...कमोडमध्ये चक्क सापडला नाग, मग पुढे असे घडले...

त्याप्रमाणे प्रशासनाने सर्व तयारी करून बदलीपात्र याद्या, बदली अधिकार शिक्षक याद्या, रिक्त जागा व समानिकरणाच्या याद्या सर्व प्रकाशित करून बदलीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.
त्यानुसार गुगल लिंकवर जवळजवळ ९५ टक्के शिक्षकांनी अर्जही भरले होते. हे सर्व सुरळीत चालू असतानाच अचानक प्रशासनाने कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे कारण पुढे करून बदल्या रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे बदलिधारक शिक्षकांमध्ये तर्कवितर्क लावल्या जात आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - विविध आव्हानांवर मात करत ‘या’ जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी

नांदेडमध्येच का बदल्या रद्द
मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद आदी ठिकाणी कोरोनाचा फैलाव वाढत असतांनाही सर्व जिल्ह्यात बदल्यांना सुरुवात झालेली आहे. मग नांदेड जिल्ह्यात असा निर्णय घेऊन आमच्यावर अन्याय का केला जातो? शिवाय बदल्या रद्द करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नसतांनाही असा निर्णय का घेतला गेला? असे प्रश्न शिक्षक विचारत आहेत.

मतभेद बाजूला ठेवून निर्णय बदलावा
मा.उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी सुध्दा बदलीस स्थगिती देण्यास स्पष्ट नकार देत याचिका निकाली काढली आहे. एवढी सगळी जमेची बाजू असतांनाही बदल्या रद्द करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्यातील वाद, मतभेद बाजूला ठेवून बदल्या रद्द बाबतचा निर्णय बदलून बदल्या करण्याचा निर्णय घ्यावा, एवढीच अपेक्षा आहे.
- जगजितसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष, शिक्षक भारती शिक्षक संघटना, नांदेड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfaction Among Substitute Teachers Nanded News