‘जय संघर्ष’ने पुसले वाहनचालकांचे अश्रू

kandhar mafdt.jpg
kandhar mafdt.jpg


कंधार, (जि. नांदेड) ः लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून गाड्या उभ्या असल्याने खासगी वाहनचालकांचे हाल होत आहेत. शासनाकडून मदत मिळेल अशी आशा बाळगून त्यांनी मदतीची प्रतीक्षा केली खरी, परंतु ती मृगजळ ठरली. मदतीसाठी शासनाचे उदासीन धोरण वाहनचालकांच्या मुळावर आले असताना जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. या संस्थेने तालुक्यातील ९५ वाहनचालकांना धान्य किट वाटप करून खऱ्या अर्थाने सामाजिक बंधिलकीचे दर्शन घडविले.

लॉकडाउनने अनेकांचे संसार उघड्यावर आणले. सर्व उद्योग, व्यवहार, कामधंदे ठप्प झाल्याने भाकरीची भ्रांत सुरू झाली. हातावर पोट असणाऱ्यांना सद्या भयानक परिस्थितीतून जावे लागत आहे. यातून वाहनचालक सुद्धा सुटले नाहीत. सरकारचे उदासीन धोरण वाहनचालकांना उदरनिर्वाहासाठी अडचणीचे ठरत आहे. अशा वेळी कंधारमधील जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेने आपल्या भावंडांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन त्यांना धान्य किट वाटप केले. शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात सामाजिक डिस्टन्सचे पालन करीत रविवारी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.


लॉकडाउनमुळे सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. रोजगार बुडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून ज्येष्ठ कलावंत, तमासगीर, बांधकाम मजूर आदींना मदत देण्यात आली. कर्नाटक व दिल्ली सरकारने वाहनचालकांना काही रक्कम देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावला. अशीच मदत राज्यातील वाहनचालकांना मिळावी यासाठी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. परंतु, याकडे सरकारने लक्ष दिले नाही.


आपल्या भावंडांच्या सुरू असलेल्या उपासमारीने व्यथित होऊन कंधार जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माधव कांबळे व सचिव शेख सादात यांनी आपल्या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. समाजातील दानशूर व्यक्तींशी संपर्क साधून त्यांनी वाहनचालकांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. कांबळे आणि शेख यांनी सातत्याने प्रयत्न चालवल्यानंतर दोन दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या. त्यांचे सहकार्य घेऊन वाहनचालक सामाजिक संस्थेने कंधार तालुक्यातील ९५ वाहनचालकांना धान्य किट वाटप करून बहुमोल कार्य केले आहे.


या धान्य किटमध्ये पाच किलो तांदूळ, पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो चणाडाळ, एक किलो पोहे, अर्धा किलो तेल आणि अर्धा किलो बेसनपीठ याचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. गाड्या उभ्या असल्याने त्यांना पगार सुद्धा मिळत नाही. दमडीही खिशात नाही. अशा वेळी काय खावे ? कसे जगावे? असा प्रश्न उभा ठाकला असतानाही सरकार वाहनचालकांना कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत नाही. सरकार असमर्थ असताना ‘जय संघर्ष’ने पुढाकार घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com