नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन झाले कोरोनामुक्त 

अभय कुळकजाईकर
Thursday, 10 September 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग झाला तर लगेच घाबरुन जाऊ नका. आधी स्वतः होम क्वारनंटाईन व्हा. मी देखील सुरवातीला दोन दिवस घरीच होतो. नंतर छातीत दुखत असल्यामुळे मग डॉक्टरांच्या सल्लाने शासकीय रुग्णालयात दाखल झालो. अनेकजण थोडा ताप किंवा सर्दी झाली की घाबरुन जातात आणि कोरोना होईल या भीतीने डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आग्रह करतात. नागरिकांनी आधी होम क्वारनंटाईन व्हावे आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नांदेड - गेल्या दहा दिवसांपासून शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना गुरूवारी (ता. दहा) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आणखी आठवडाभर निवासस्थानी राहिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून ते कामकाज करणार आहेत. दरम्यान, त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना संसर्गाच्या काळातही काम सुरु आहे. कोरोना संसर्गाला घाबरुन न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

नांदेड जिल्ह्यात गेल्या दहा पंधरा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह इतर सर्व अधिकारी व यंत्रणा कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी युद्धपातळीवर काम करत असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

हेही वाचा - नीट परीक्षेतील विद्यार्थी, पालकांच्या सोईसाठी रविवारी लॉकडाउनमध्ये मुभा

अनंत चतुदर्शीला अहवाल पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गचा संशय आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. ३१ आॅगस्ट रोजी स्वॅब दिला. पहिला स्वॅब निगेटिव्ह आला पण नंतर पुन्हा ताप आल्यामुळे स्वॅब दिला आणि त्याचा अहवाल अनंत चतुदर्शी दिवशी मंगळवारी (ता. एक सष्टेंबर) रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेले आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अशा जवळपास पन्नास जणांचेही त्यानंतर स्वॅब घेण्यात आले. त्यात आयुक्त डॉ. लहाने यांच्यासह इतरांचे स्वॅब निगेटिव्ह आले. 

शासकीय रुग्णालयात घेतला उपचार
दरम्यान, डॉ. विपीन यांनी शासकीय रुग्णालयात दहा दिवस उपचार घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. माझी प्रकृती स्थिर असून तुम्हा सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर लवकरच मी यशस्वी मात करुन पुन्हा जोमाने काम सुरु करणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार गेले दहा दिवस त्यांनी उपचार केले आणि यशस्वीपणे कोरोनावर मात केली. त्यामुळे गुरूवारी (ता. दहा) त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या
दरम्यान, कोरोनाचा आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे तो इतरांनाही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, शारिरिक अंतर ठेवणे तसेच शासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे महत्वाचे आहे. आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

हेही वाचलेच पाहिजे - स्वातंत्र्याची ७४ वर्षे लोटली तरी किनवट तालुक्यातील वसंतवाडीला रस्ता नाही 

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग झाला तरी लगेच घाबरुन जाऊ नका. आधी स्वतः होम क्वारनंटाईन व्हा. मी देखील सुरवातीला दोन दिवस घरीच होतो. नंतर छाती दुखत असल्यामुळे मग डॉक्टरांच्या सल्लाने दवाखान्यात दाखल झालो. अनेकजण थोडा ताप किंवा सर्दी झाली की घाबरुन जातात आणि कोरोना होईल, या भीतीने डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आग्रह करतात. नागरिकांनी आधी होम क्वारनंटाईन व्हावे आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावे. सध्या रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढल्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector of Nanded Dr. Vipin became corona-free, Nanded news