जिल्ह्यासाठी लवकरच ४० हजार कोरोना किट मिळणार - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर

शिवचरण वावळे
Thursday, 8 October 2020

कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे ४० हजार कोरोना किटची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मागणीला प्रतिसाद देत आठवडाभरातच जिल्ह्यासाठी ४० हजार किट उपलब्ध होतील असा विश्‍वास देखील व्यक्त केला जात आहे. 

नांदेड ः  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाची जिल्हा प्रशासनाकडून काटेकोरपणे अमलबजावणी सुरु आहे. कोरोना चाचणीत किटच्या कमतरतेमुळे अडथळा नको म्हणून बुधवारी (ता. सात) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे ४० हजार कोरोना चाचणी किटची मागणी केली आहे.
 
डॉ. निळकंठ भोसीकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ४० हजार चाचणी किटची मागणी केली आहे. मागच्या आठवड्यात जिल्ह्यासाठी २५ हजार कोरोना चाचणी किट उपलब्ध झाल्या आहेत. चाचणी किट मिळाल्याने जिल्ह्यातील कोरोना चाचणीचा वेग वाढला आहे. असे असले तरी, जिल्ह्यात कोरोना चाचणी मोहिमेला गती देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग कामाला लागला आहे. कोरोना चाचणी किटची कमतरता भासू नये, म्हणून करण्यात आलेल्या किटच्या मागणीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी देखील तात्काळ मंजुरी दिली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली.

हेही वाचा- नांदेड - सावधान दुखणे अंगावर काढू नका, उशीरा दाखल झालेल्या रुग्णांचा होतोय मृत्यू ​

 नुकत्यात २५ हजार कोरोना किट मिळाल्या

आतापर्यंत जिल्ह्यात ८९ हजार ११ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ६८ हजार ७९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १६ हजार ८४१ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी १३ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नुकत्यात २५ हजार कोरोना किट मिळाल्यापासून दिवसाला हजार ते बाराशे जणांची चाचणी करण्यात येत आहे. बुधवारी एक हजार २७७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यात एक हजार २८ निगेटिव्ह, तर २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- हॉटेल, रेस्टॉरन्ट, बारमधील कामगारांच्या कोरोना तपासणीसाठी फिरते पथक - जिल्हाधिकारी डॉ. विपीन​

चाचणीच्या वेगासोबतच मृत्यू दरात घट होण्याचे मोठे अवहान

जिल्ह्यातील कोरोना चाचणी टेस्ट वाढविण्यात आल्या असल्या, तरी उपचार सुरु असलेल्या बाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी होताना दिसत नाही. दिवसाला पाच ते आठ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू होत आहे. हे प्रमाण कमी करण्याचे आरोग्य विभागापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे जिल्ह्यास पुन्हा ४० हजार चाचणी किट मिळाल्यास कोरोना चाचणीच्या वेगासोबतच मृत्यू दरात घट होणे, हे देखील तितकेच मोठे अव्हान असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The district will soon get 40,000 corona kits - District Surgeon Dr. Nilkanth Bhosikar Nanded News