विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

प्रल्हाद कांबळे
Thursday, 4 March 2021

विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांचा कोरोना योद्धा म्हणून मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

नांदेड : नांदेड येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने कोरोना काळामध्ये कृषी विभागाने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लातूर विभागाचे कार्यतत्पर विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांचा कोरोना योद्धा म्हणून मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी यवनकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शामसुंदर शिंदे, गुरुद्वारा बोर्डाचे बाबा हरीसिंघजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवादे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस महानिरीक्षक द्वाराकादास चिखलीकर, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अंकुश देवसरकर, धनंजय पाटील, श्री. देवसरकर, रवी ढगे, शंकर पवार निवघेकर, बालाजी इंगळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान करण्यात आला.

मागील वर्षभराच्या कोरोनाच्या काळात लातूर विभागाच्या कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने विभागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना मिळावा व शेतमाल विक्रीकरतेवेळेस शेतकऱ्यांना कुठलाही नाहक त्रास होऊ नये यासाठी विशेष सुविधा राबवल्या होत्या. त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे वेळेवर मिळून शेतकऱ्यांच्या पेरणी होण्यासाठी तुकाराम जगताप यांनी विभागामध्ये योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणींचा सामना किंवा तारांबळ होऊ दिली नाही. 

कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी योग्य समन्वय ठेवून कोरोना काळात शेतकऱ्यांसाठी विशेष योगदान दिले. या सर्व उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल तुकाराम जगताप यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Agriculture Joint Director Tukaram Jagtap honored as Corona Warrior nanded news