लॉकडाउनचा नियम मला शिकवतोस काय म्हणून चक्क पोलिसाला...  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पोलिसाला मारहाण करून धमकी दिली. शासकिय कामात अडथळा निर्माण करून खाली पाडले. यात पोलिसाला दुखापत झाली.

नांदेड : तपासणीसाठी माझी दुचाकी का अडविली म्हणून एकाने चक्क पोलिसाला मारहाण करून धमकी दिली. शासकिय कामात अडथळा निर्माण करून खाली पाडले. यात पोलिसाला दुखापत झाली. हा प्रकार गुरूवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास आंबेडकर चौक, भोकर येथे घडला. 

भोकर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक ईश्‍वर बळीराम राठोड हे लॉकडाउनच्या बंदोबस्तात भोकर शहराच्या डॉ. आंबेडकर चौकात वाहन तपासणी करीत होते. गुरूवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी (एमएच२६-बीएफ-३३७१) स्वार आला. त्याच्या तोंडाला मास्क नव्हते. तो दुचाकी वेडीवाकडी चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असल्याने त्याला ईश्‍वर राठोड यांनी थांबविले. तोंडाला मास्क का बांधले नाहीस व कुठे चाललास ? असे विचारताच दुचाकीस्वाराने तु मला विचारणारा कोण असे म्हणून दुचाकीवरुन उतरुन श्री. राठोड यांना धक्काबुक्की केली. 

हेही वाचा -  या’ कारणामुळे आईने फेकले बाळाला कंन्टेनरखाली...

पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण

तसेच धक्का देऊन त्यांना खाली पाडले. यात पोलिस श्री. राठोड यांना जबर दुखापत झाली. तसेच दुचाकीस्वाराने जिल्हाधिकारी यांचे आदेश व लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवीत शासकिय कामात अडथळा निर्माण केला. परंतु पोलिसाने त्याला जागीच पकडून पोलिस ठाण्यात हजर केले. त्याची चांगलीच धुलाई करुन त्यानंतर इश्‍वर राठोड यांच्या फिर्यादीवरुन दुचाकीचालकाविरुद्ध विविध कलमान्वये भोकर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २२) पहाटे दोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डेडवाल करत आहेत. 

सासरच्या छळामुळे
विवाहितेची आत्महत्या

नांदेड : शहरातील शिवनेरीनगर येथे राहणाऱ्या आशा ओमप्रकाश चव्हाण (वय ३७) या विवाहितेस तिच्या सासरच्या मंडळींनी जीप खरेदीसाठी दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवल्यामुळे विवाहितेने मंगळवारी (ता. १९) घरात छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी अकोला (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील माधव मारुती पवार यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार लांडगे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you teach me the rules of lockdown Beating the police nanded news