esakal | बसव अनुभव मंटपसाठी एक एकर जमिन दान; पटने कुटुंबियाचा आदर्श
sakal

बोलून बातमी शोधा

बसवेश्वर महाराज मंटपसाठी जमिन दान

बसव अनुभव मंटपसाठी एक एकर जमिन दान; पटने कुटुंबियाचा आदर्श

sakal_logo
By
विठ्ठल चंदनकर

बिलोली ( जिल्हा नांदेड ) : संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र सीमेवर जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या बसवतत्वांचे प्रचार व प्रसार करणाऱ्या अॅड. शिवानंद हैबतपूरे यांच्या बसव अनुभव मंटप समितीस माजी आमदार गंगाधर पटणे व त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापिका नंदाबाई पटणे यांनी बिलोली- धर्माबाद महामार्गावरील अर्जापूर येथील पवित्र भूमीत असणारी एक एकर जमीन दान पत्राद्वारे हस्तांतरित करुन दिली आहे. त्यामुळे तिन्ही राज्याच्या सीमेलगत असलेल्या अर्जापूर येथील पवित्र भूमीत समतावादी विचारांची जोपासना केली जाणार आहे.

मागील दोन दशकांपासून बिलोलीचे माजी आमदार गंगाधर पटने हे महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यांमध्ये बसवेश्वरांच्या विचाराचे अनुयायी म्हणून कार्यरत आहेत. कर्नाटक राज्यातील भालकी येथील हिरेमठ संस्थानने महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातूनही बसवेश्वरांचा विश्वसंदेश समाजातील सर्व घटकांना पोचविण्याचे कार्य बजावताना दिसत आहेत. त्याबरोबरच उदगीर येथील सुप्रसिद्ध बसवकथाकार, लेखक व व्याख्याते अॅड. शिवानंद हैबतपूरे यांनीही महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये बसव अनुभव मंटप समितीच्या माध्यमातून महात्मा बसवन्नांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करीत आहेत. समतेच्या चळवळीच्या माध्यमातून समाजातील बहुजनांना एकत्र आणून नवसमाज निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा - उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज अर्धा तास चर्चा झाली

महात्मा बसवन्नांनी बाराव्या शतकात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून अनुभव मंटपाच्या माध्यमातून जातीविरहीत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यादृष्टीने अनुभव मंटपास महत्त्व प्राप्त झाले आहे. चार राज्याच्या सीमेवर महात्मा बसवण्णा यांच्या समतावादी विचारांची जोपासना करण्याच्या उद्देशाने माजी आमदार गंगाधर पटने व नंदाबाई पटने या दाम्पत्यांनी अनुभव मंटपासाठी एक एकर जमीन बसव अनुभव मंटप समितीस दानपत्र करुन दिली आहे.

अॅड. शिवानंद हैबतपूरे यांनी महात्मा बसवण्णा यांच्या विचारांचे व समतेच्या चळवळीचे केंद्र उभा करण्याचा संकल्प केला असून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्याच्या सीमेलगत असलेल्या व मराठवाडा मुक्ती संग्रामातील क्रांतीवीराची भूमी म्हणून पवित्र झालेल्या अर्जापूर सारख्या ठिकाणी बहुजन समाजातील सर्व घटकांपर्यंत महात्मा बसवन्नांचे बसव विचार पोहोचविण्याचे विविध उपक्रम या मंटपाच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. या बरोबरच या अनुभव मंडपात विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र, लिंगायत तसेच जंगम प्रशिक्षण केंद्रही सुरुवात करण्यात येणार आहे. चळवळीला उपयुक्त असलेल्या समतावादी साहित्य बरोबरच समग्र शरण साहित्याची उपलब्धी ही मंटपात करुन दिल्या जाणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image