उपनगराध्यक्ष डॉ.कुडमुलवार यांच्यावर अविश्वास ठराव पारित

अमरनाथ कांबळे
Monday, 25 January 2021

कुंडलवाडी नगरपालिकेवर 2016 मध्ये भाजपाची एक हाती सत्ता प्रस्थापित होती. तत्कालीन नगराध्यक्षा डॉ.आरुणा कुडमुलवार यांनी विविध मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना 7 सप्टेंबर 2020 रोजी नगररचना विभागाने अपात्र केले होते.

कुंडलवाडी (नांदेड) : येथील नगरपालिका सभागृहात नगरसेवकांची विशेष सभा (ता. 25) बोलावून उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठल कुडमुलवार यांच्याविरुद्ध 12 नगरसेवकांनी अविश्वास दाखवला आहे. ठरावाच्या बाजूने हात उंचावून त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित केला आहे.

कुंडलवाडी नगरपालिकेवर 2016 मध्ये भाजपाची एक हाती सत्ता प्रस्थापित होती. तत्कालीन नगराध्यक्षा डॉ.आरुणा कुडमुलवार यांनी विविध मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना 7 सप्टेंबर 2020 रोजी नगररचना विभागाने अपात्र केले होते. तद्नंतर उपनगराध्यक्ष डॉ. कुडमुलवार यांच्यावर नाराजगी व्यक्त करत भाजपाच्या सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत काँग्रेससोबत हातमिळवणी करून शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार यांना (ता.1) ऑक्टोबर 2020 रोजी नगराध्यक्ष पदावर विराजमान करून महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित केले.

हे ही वाचा : महावितरण विद्युत मंडळाच्या नावाने दुष्काळी अनुदान; शेतकऱ्यांचे खाते नंबरही चुकीचे, महसूल विभागाचा अनागोंदी कारभार

नगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपाचे उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमुलवार यांना उपाध्यक्ष पदावरून हटविण्याचे हालचालीना वेग येऊन अखेर (ता. 25) रोजी नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांच्या उपस्थितीत (ता. 25) रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका सभागृहात नगरसेवकांची विशेष सभा बोलावून उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमुलवार यांच्यावर अविश्वास ठराव घेण्यात आला. 

त्यात 12 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून डॉ. विठ्ठल कुडमुलवार यांना उपाध्यक्षपदावरून पायउतार केले आहे. या मतदान प्रक्रियेत नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, नगरसेवक शेख मुखत्यार, नंदाबाई कांबळे, गंगामणी भास्कर, सावित्रा पडकूटलावार, सचिन कोटलावार, सुरेश कोंडावार, शैलेशऱ्याकावार, शंकर गोनेलवार, शकुंतला खेळगे, प्रायगबाई शिरामे, विणा कोटलावार यांनी सहभागी झाले होते. असे असले तरी भाजपाच्या पती व पत्नीला सत्तेतून बेदखल केल्यानंतर आगामी काळात कोण उपनगराध्यक्ष पदावर विराजमान होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Kundalwadi a no confidence motion has been passed against vitthal kudmulwar